लोकाईच्या तोंडातला सूर मंजे झाडीबोलीचा रुप
By Admin | Updated: December 27, 2015 01:23 IST2015-12-27T01:23:39+5:302015-12-27T01:23:39+5:30
आपल्या राज्यात बहुभाषेत लोक बोलतात. तशाचवानी आपल्या झाडीपट्टीची झाडीबोली ही मायबोली हो. या सप्पा बोलीभाषेची लिवायची लिपी मातूर एकच. ते मंजे मराठी हो.

लोकाईच्या तोंडातला सूर मंजे झाडीबोलीचा रुप
ग.रा. वडपल्लीवार यांचे प्रतिपादन : झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
रमेश नान्ने पेंढरी(कोके)
आपल्या राज्यात बहुभाषेत लोक बोलतात. तशाचवानी आपल्या झाडीपट्टीची झाडीबोली ही मायबोली हो. या सप्पा बोलीभाषेची लिवायची लिपी मातूर एकच. ते मंजे मराठी हो. आपल्या झाडीपट्टीच्या लोकाईच्या तोंडातला सूर मंजे आपल्या झाडीबोलीचा रुप हो, अशा अस्सल झाडीपट्टी भाषेत संमेलनाध्यक्ष ग.रा. वडपल्लीवार गुरुजी यांनी अध्यक्षीय पुष्प गुंफले.
कर्मयोगी पूज्य श्री तुमकारादादा गीताचार्य झाडीबोली साहित्य नगरीत आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती रा. वडपल्लीवार होते. संमेलनाचे उद्घाटन आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजुऱ्याचे माजी आमदार वामनराव चटप, झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, कार्याध्यक्ष डॉ. राजन जैस्वाल, स्वागताध्यक्ष तथा सरपंच छबु शिंदे, कार्याध्यक्ष व उपसरपंच यादव मेश्राम, विदर्भ वायगाव हळद संघटनेचे माजी सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार सदाशिव नान्ने, ज्येष्ठ साहित्यिक व कवी नागो थुटे, बाबुराव टोंगे, विदर्भाच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे, दिवाकर मोरस्कर, साकोलीचे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, डोमाजी कागपते, माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, भगवान नान्ने, गुलाब चौधरी, हरिभाऊ पाथोडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी निमित्ताने हे २३ वे झाडीबोली साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. सकाळी ग्रामसफाई, ध्यान, घटस्थापनेनंतर संपूर्ण गावातून गणपती वडपल्लीवार, डॉ. राजन जैस्वाल यांच्या नेतृत्त्वात पुस्तक पोहा दिंडी काढण्यात आली. यानिमित्त गाव पूर्ण स्वच्छ करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर ग्रामगीता सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. लिलाधर चुनारकर यांच्या संपूर्ण कुटुंबाने ‘हम सेवक थे’ हे स्वागत गीत सादर केले. झाडीबोलीचे गौरवगित कवी लेकराम शेंडे यांनी सादर केले. प्रास्ताविक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
माजी संमेलनाध्यक्ष प्रा. धनराज ओक यांनी आताचे संमेलनाध्यक्ष ग.रा. वडपल्लीवार यांच्याकडे कारभार सोपवून आपला अनुभव कथन केला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात वडपल्लीवार यांनी झाडीबोली भाषा व इतर भाषेची उदाहरणासह तुलना करून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रेमदास मेंढूलकर यांनी तर आभार प्रा. भास्कर वाढई यांनी मानले. १५० ते २०० किलोमीटर अंतरावरून कवी, लेखक, साहित्यिक संमेलनासाठी आवर्जुन आले होते, त्यामुळे गावाला यात्रेचे रूप आले होते.