जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’
By Admin | Updated: December 31, 2015 01:11 IST2015-12-31T01:11:31+5:302015-12-31T01:11:31+5:30
तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगातील प्रत्येक घटना क्षणात गाव खेड्यापर्यंत पोहचतात.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’
राजकुमार चुनारकर खडसंगी
तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगातील प्रत्येक घटना क्षणात गाव खेड्यापर्यंत पोहचतात. त्यातच संगणकीय क्रांती व मोबाईलच्या वापरामुळे गाव-खेड्यातील सामान्य नागरिकही स्मार्ट झाला आहे. शासनाचेही प्रत्येक विभागातील काम संगणकाद्वारे केल्या जात आहेत. त्यामुळे संगणकीय ज्ञान आवश्यक गरज झाली आहे. संगणकीय ज्ञानापासून गावातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पुढारातून चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांना संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’ येणार आहे.
खासगी शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढावा व विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकून राहावी, याकरिता शासन अनेक योजना राबवित आहे. त्याच दृष्टीने शासन शाळेमध्ये ई-स्कुल, ई-लर्निंग सारखे उपक्रम काही मोजक्या शाळेत राबवित आहे. मात्र माझ्या गाव-खेड्यातील जिल्हा परिषद शाळाही खासगी शाळेच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून सामाजिक बांधीलकी जोपासत व गुरुजीच्या ऋणांची परतफेड म्हणून शिक्षक दिनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: करीत आमदार कीर्तीकुमार भांगडिया वैयक्तिक मिळकतीतून ५१ जिल्हा परिषद शाळांना संगणक संच उपलब्ध करून देणार आहेत.
चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६१ शाळांना संगणक देणे शक्य नसल्याने ५१ शाळांना संगणक देण्याची घोषणा आमदार भांगडिया यांनी केली होती. त्यामुळे १६१ शाळेमधून ५१ शाळांची निवड करण्याकरिता शिक्षकांच्या मदतीने ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे. एका शैक्षणिक कार्यक्रमात या ५१ शाळांना संगणक संच देण्यात येणार आहेत. त्यामुळे चिमूर तालुक्यातील ५१ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘माऊस’ येणार आहे.