प्रस्तावित कोविड रुग्णालयासमोर समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:41+5:30
मनपाच्या राणी हिराई सभागृहातील ऑनलाईन सर्वसाधारण सभेत महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, गटनेते वसंत देशमुख, बसपाचे गटनेते अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेते प्रदीप देशमुख, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे, सर्व नगरसेक, नगरसेविका आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते.

प्रस्तावित कोविड रुग्णालयासमोर समस्यांचा डोंगर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर मनपाने ४५ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली. सध्याच्या चिंताजनक स्थितीमुळे प्रस्तावित रुग्णालयाच्या उपयोगितेला नगरसेवकांचा विरोध नाही. मात्र, डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी, ऑक्सिजन व अन्य सुविधांबाबत मनपाकडे ब्लू प्रिंट नसल्याने समस्यांचा डोंगर पार करावा लागणार त्याचे काय, असा प्रश्न सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभेत विचारला आहे.
मनपाच्या राणी हिराई सभागृहातील ऑनलाईन सर्वसाधारण सभेत महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, गटनेते वसंत देशमुख, बसपाचे गटनेते अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेते प्रदीप देशमुख, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे, सर्व नगरसेक, नगरसेविका आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते. कोविड रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर नगरसेवकांनी विविध सूचना करून प्रश्नांची सरबत्ती केली. नगरसेवक नंदू नागरकर यांनी कोविड रुग्णालय उभारण्यास आधीच उशिरा झाल्याचे सांगून, मदतभेद विसरून आता रुग्णालयासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
४५ खाटांसाठी सव्वादोन कोटी खर्च अपेक्षित
नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी दोन कोटी २५ लाखांचा निधी अपेक्षित आहे. आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने खाटा वाढविण्यात येतील, अशी माहिती महापौर राखी कंचर्लावार यांनी सभेत दिली.
रुग्णालयासाठी बॅरि. खोब्रागडे सभागृहाचा विचार
प्रस्तावित ४५ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी बाबूपेठ परिसरातील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाची निवड करण्याचा विचार सुरू आहे. सर्व बेड्स ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधायुक्त राहतील. रुग्णालयासाठी एक कोटीच्या आमदार निधीचे नियोजन सुरू असल्याची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.
टिपणीत रुग्णालयाचा तपशीलच नाही
कोविड रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देतानाच सभेसाठी काढण्यात आलेल्या टिपणीत रुग्णालयाबाबत अत्यंत त्रोटक माहिती आहे. रुग्णालयासाठी लागणारे डॉक्टर्स, आरोग्यसेविका, प्रशिक्षित मनुष्यबळ, रुग्णालय उभारण्याचा कालावधी याबाबत काहीच माहिती नाही. कोरोनाचा कहर सुरू असल्याने मनपाकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे हा विषय मार्गी लावताना येणाऱ्या संभाव्य अडचणींकडे काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, नंदू नागरकर व अन्य नगरसेवकांनी लक्ष वेधले. थेट मंजुरी आणण्याआधी नगरसेवकांची चर्चा करणे गरजेचे होते, अशी भूमिका सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही मांडली.