खून, फसवणूक, विनयभंगाची प्रकरणे अधिक
By Admin | Updated: February 12, 2015 00:57 IST2015-02-12T00:57:13+5:302015-02-12T00:57:13+5:30
बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे ...

खून, फसवणूक, विनयभंगाची प्रकरणे अधिक
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी आहे. राज्याची सीमा बदलणारे रेल्वे स्थानक येथेच आहे. परिणामी शहरात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, कलकत्ता व अन्य राज्यातील कामगारांनी व नागरिकांनी येथील वास्तव्याला पसंती दिली. सामाजिक सलोखा राखत असतानाच काही गुन्हेगार प्रवृत्ती डोके वर काढत आहे. विविधतेत राहणाऱ्या नागरिकांना एकसूत्रता ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. तरीही मागील वर्षी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच खून, चार खूनाचा प्रयत्न, दोन फसवणूक, १५ घरफोड्या व १२ विनयभंगाचे प्रकार घडले आहे.
सामाजिक सलोख्यासाठी केला जातो प्रयत्न
बल्लारशाह पोलीस ठाण्याने आजवर अनेक गंभीर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. येथे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय वडस्कर यांच्या कथित खूनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. दुहेरी खूनाचा प्रकारही घडला. खून करुन प्रेत स्मशानभूमीत पुरल्यानंतर प्रकरणाचा उलघडही झाला. तरी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. आपली समाजव्यवस्था उत्सव प्रिय असल्याने पोलीस ठाण्यांतर्गत शांतता समितीत्यांचे गठन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सभा धार्मिक सण, गणेशोत्सव, दुर्गाेत्सोव व शारदा उत्सवादरम्यान घेण्यात येवून समन्वयाची भूमिका पोलीस प्रशासनाला पार पाडावी लागते. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पोलिसांवर ताण येतो. त्यावर येथील पोलिसांनी मात करुन सामाजिक व राजकीय सलोखा जोपासण्याचा प्रयत्न या पोलीस ठाण्याने आजवर जपल्याचे दिसून येते.
५ ते ३० कि.मी. विस्तारलेले क्षेत्र
बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील १९ गावांचा समावेश आहे. येथील ठाण्यापासून मोहाळी खुर्द व मानोरा गावाचे अंतर तब्बल ३० किलोमीटर असून सर्वात कमी अंतरावरील ग्रामीण बामणी (दुधोली) व विसापूर पाच किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये जुनोना, कारवा, आसेगाव, गिलबिली, इटोली, किन्ही, आमडी, कळमना, कोर्टिमक्ता, कोर्टितुकूम, लावारी, दहेली आदी गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र पाच किलोमीटरपासून ३० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून बल्लारपूरसह ग्रामीण भागावरील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा बिट तयार करण्यात आले आहेत.
पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचण
बल्लारपूर पोलीस ठाणे १९५६ मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी दोन अधिकारी जेमतेम ५० कर्मचारी कार्यरत होते. आजघडीला लोकसंख्या वाढली असून कार्य क्षेत्र देखील वाढले आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक पदासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच उपपोलीस निरीक्षक, ३० पोलीस हवालदार, १०७ पोलीस शिपाई असे एकूण १४४ पदे मंजुर आहेत. तरीही येथे तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांसह ३९ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे पोलिसांना कर्तव्य बजावताना पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
२५ वर धार्मिक स्थळांची संख्या
पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक स्थळांची संख्या २५ वर आहे. शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह १० पुतळे उभारले आहेत. मुस्लिम धर्माच्या नऊ मशिदही आहेत, अन्य धार्मिक स्थळात गोंडकालीन राजाची समाधी, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, गुरुद्वारा, चर्च, राममंदिर, दर्गा, विविध मंडळाची बौद्ध विहारे असून आजतागायत येथे अनुचित प्रकार घडला नाही. यावरुन नागरिकांची सर्वधर्मसमभाव वृत्ती पोलिसांना सहकार्य करणारी आहे.
मागील वर्षात घडल्या
पाच खुनाच्या घटना
बल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत २०१३ च्या तुलनेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घट झाली असली तरी मागील वर्षी पाच खूनाच्या घटना घडल्या. याप्रकरणात आरोपिना जेरबंद करण्यात आले. यासोबतच चार घटनेत खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ६४ प्रकरणात सराईत गुन्हेरागांकडून दुखापत करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या अनुषंगाने गुन्हेगार प्रवृत्तीच्या १९ जणांना तडीपार केले आहे. घरफोडीचे १५ व चोरी प्रकरणात १० गुन्हे नोंदवून आरोपिंना जेरबंद करण्यात पोलिसांनी भूमिका बजावली.