मानधन वाटपात अनियमितता

By Admin | Updated: May 9, 2014 02:47 IST2014-05-08T23:42:31+5:302014-05-09T02:47:53+5:30

तळोधी(बा.) : लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यप्रणालीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांचे मानधन देण्यात आले नाही.

Monetary allocation irregularity | मानधन वाटपात अनियमितता

मानधन वाटपात अनियमितता

तळोधी(बा.) : लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यप्रणालीत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना अद्यापही त्यांचे मानधन देण्यात आले नाही. प्रक्रीया ओटपताच, प्रशासनाने या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. प्रक्रीयेदरम्यान वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, मतदान केंद्रावर असणारी गैरसोय, कामाचा मोबदला म्हणून मिळणार्‍या मानधनात असणारी तफावत यामुळे शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. चिमूर- गडचिरोली लोकसभा मतदार क्षेत्राअंतर्गत चिमूर क्षेत्रात नियुक्त कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण चिमूर येथे पार पडले. परंतु यावेळी कर्मचार्‍यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. शिक्षकांना फक्त उपस्थित राहण्याकरीताच बोलाविले होते. तेथे कोणत्याच कामाचे व्यवस्थापन करण्यात आले नव्हते. याच भागातील कर्मचार्‍यांना दुसर्‍या प्रशिक्षणासाठी ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आले होते. प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक व व्यवस्था अगदी उत्तम होती. परंतु ९ एप्रिलला संबंधित कर्मचार्‍यांपैकी राखीव कर्मचार्‍यांना अनुपस्थित कर्मचार्‍यांच्या जागी नियुक्त करताना निवडणूक अधिकार्‍यांनी उपस्थित कर्मचार्‍यांचा केलेला पानऊतारा अद्यापही शिक्षक विसरले नाहीत.

मतदान केंद्राची व्यवस्था करणारे महसूल विभागाचे कर्मचारी मतदान केंद्रावर उपस्थित नव्हते. मतदान केंद्रावरील अपुरी सुविधा गंभीरपणे विचारात घेतल्याच गेली नाही. कित्येक केंद्रावर विजेची व्यवस्था नसल्यामुळे कर्मचार्‍यांना मेनबतीच्या प्रकाशात काम करावे लागले. रात्र जागून काढून मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागल्याची व्यथा संंबंधित कर्मचार्‍यांनी ‘लोकमत’ ला सांगितली. इतकेच नव्हते तर अनेक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष तर मुख्याध्यापक मतदान अधिकारी या पदावर काम करताना पहायला मिळाले. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये निवडणूक कामाच्या मानधन वाटपातसुद्धा मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे या कामाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया काय आहे.

याविषयी कर्मचार्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांचे मानधन हे त्याच्या मूळ पगाराच्या वेतनानुसार दिले जायचे. त्यामध्ये थोडीफार तफावत मान्य केली जात होती. परंतु या वेळच्या निवडणूक प्रक्रियेत एकाच शाळेतील एकाच पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळालेल्या मानधनात तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर अनेक मतदार केंद्रातील केंद्राध्यक्षांना मिळालेले मानधन त्याच केंद्रावरील कर्मचार्‍यांना मिळालेल्या मानधनापेक्षा कमी मिळाले, तर शेवटच्या क्रमांकावरील कर्मचार्‍याला सर्वात अधिक मानधन मिळाल्याची माहिती अनेकांनी दिली. या सर्व प्रकारामुळे मानधन वाटपात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे ज्या कर्मचार्‍यांना कमी मानधन मिळाले. त्यांना त्यांच्या कार्यालयात उर्वरित मानधन वाढविण्याची व्यवस्था विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक अधिकार्‍यांनी करावी, अशी मागणी निवडणुकीचे काम करणार्‍या शिक्षकांनी केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Monetary allocation irregularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.