विंधन विहिरीवर भागते मोहाळी (मो.) गावाची तहान
By Admin | Updated: August 3, 2015 00:45 IST2015-08-03T00:45:54+5:302015-08-03T00:45:54+5:30
काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.

विंधन विहिरीवर भागते मोहाळी (मो.) गावाची तहान
नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील मोहाळी (मोकासा) या गावाचेही असेच आहे. नेते लोकांचा गाव म्हणून या गावाची पंचक्रोशीत ओळख आहे. मात्र गावात पाण्याची सोय नसल्याने विंधन विहिरींवरच गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे.
नागभीड-नागपूर राज्य महामार्गावर हे गाव वसले आहे. अडीच हजाराच्या आसपास या गावाची लोकसंख्या असून जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी या गावात असल्याने राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असे हे गाव आहे. एवढेच नाही तर या गावातील तिघांना आजवर राष्ट्रीय पक्षांची राज्य विधानसभेची उमेदवारी मिळाली असून यातील एक आमदारही झाले आहेत. जि.प.चे सभापती व अध्यक्ष देणारा गाव अशी या गावाची ओळख सांगितली, तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशी पार्श्वभूमी असलेले हे गाव सर्वार्थाने पुढारलेले असेच आहे. गावात एक हायस्कूल आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. एक बँक आहे अशा सोयी येथे आहे. मात्र या पुढारलेल्या गावात पाण्याची कोणतीच सोय नाही. सात-आठ वर्षापूर्वी येथे पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. पण आजपावतो हे काम अर्धवट स्थितीतच पडून आहे. आजही लोकांना विंधन विहिर, विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)