अर्धवट उड्डाणपुलाजवळ मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:05 IST2018-12-27T23:05:25+5:302018-12-27T23:05:40+5:30
येथील वरोरा नाका उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.

अर्धवट उड्डाणपुलाजवळ मनसेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील वरोरा नाका उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.
मनसेतर्फे यावेळी आंबेडकर कॉलेजसमोरील अर्धवट पुलाचे नामकरण ‘सार्वजनिक बांधकाम विभागाचे समाधी स्थळ’ असे करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून वरोरा नाका परिसरातील पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. त्या संदर्भात बांधकाम विभागामध्ये पाठपुरावा केला असता निधीअभावी काम बंद आहे, असे उत्तर मिळाले. डॉ. आंबेडकर कॉलेजची ओळख दीक्षाभूमी अशी आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामा यासारख्या थोर पुरुषांचे चरण स्पर्श झाले आहे. आणि त्याच दीक्षाभूमीसमोर अधर्वट ब्रिज ठेऊन सरकार काय साध्य करीत आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनाचे आयोजन मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले. यावेळी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक उपस्थित होते.
मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष तसेच नगरसेवक सचिन भोयर, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, महिला सेना शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, महेश शास्त्रकार, मयूर मदनकर, भरत गुप्ता, शिरीष माणेकर, राकेश बोरीकर, नितेश जुमडे, सतीश वाकडे, नितीन टेकाम, करण नायर, चैतन्य सदाफळ, किशोर मडगुलवार, कृष्णा गुप्ता, शेख हकानी, भाऊराव डांगे, बंडू गेडाम उपस्थित होते.