‘त्या’ जखमींची आमदारांनी घेतली भेट
By Admin | Updated: May 16, 2016 01:10 IST2016-05-16T01:10:55+5:302016-05-16T01:10:55+5:30
आवारपुरातील दारू विक्रेत्याने वाढई दाम्पत्यावर अॅसिड हल्ला केला, त्यात संगीता नामदेव वाढई व पती नामदेव वाढई हे दोघेही गंभीर झाले.

‘त्या’ जखमींची आमदारांनी घेतली भेट
आवाळपूर : आवारपुरातील दारू विक्रेत्याने वाढई दाम्पत्यावर अॅसिड हल्ला केला, त्यात संगीता नामदेव वाढई व पती नामदेव वाढई हे दोघेही गंभीर झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांची भेट घेऊन आमदार संजय धोटे यांनी त्यांची विचारपूस करून घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली.
कृत्य अत्यंत निंदनीय असून ही बाब गंभीरतेने घेण्याबद्दल पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई होईल, अशी ग्वाही संजय धोटे यांनी दिली.
महिलेवर अशा प्रकारचा भ्याड हल्ला होणे ही बाब गंभीर असून घडलेल्या घटनेची शासनाने दखल घेतली असून अशा घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तरुणाईने लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दारूविक्रीकडे भरकटून जाऊ नये. हा मार्ग आयुष्याचे मातेरे करणारा आहे. त्यामुळे तरुणांनी कठोर परिश्रमाने, संघर्षाने जीवन जगावे व यश संपादन करून चांगल्या मार्गाने पैसा कमवावे व आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करावे, असा सल्लाही धोटे यांनी तरुणांना दिला.
दारुबंदी असतानाही अवैध दारू विक्रेते आपला जम बसवू पाहत आहेत. या दारु विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी शासन गंभीर असून येत्या अधिवेशनात आपण स्वत: हा मुद्दा हाती घेऊन दारूविक्रेत्यांना जास्तीत जास्त शिक्षा आणि कठोर कायदे करण्यासाठी प्रयत्न करणारा आहोत. तसेच कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळेल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.भाजपाकडून या घटनेचा तिव्र निषेध करून गुन्हेगारावर जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. यावेळी सय्यद आबीद अली, संजय मुसळे, रमेश मालेकर, नुर शेख, मदन पैदाने, सुरेश टेकाम, वासुदेव, भाऊराव कुडमेथे, विठ्ठल जुनघरे, निरंजने, उपसरपंच अविनाश चौधरी उपस्थित होते. (वार्ताहर)