वाषिक आमसभेत विविध समस्यांवर आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By Admin | Updated: March 2, 2015 01:10 IST2015-03-02T01:10:52+5:302015-03-02T01:10:52+5:30
भद्रावती पंचायत समितीची वार्षिक आमसभा बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ग्रामोदय संघाच्या सभागृहात पार पडली.

वाषिक आमसभेत विविध समस्यांवर आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
भद्रावती : भद्रावती पंचायत समितीची वार्षिक आमसभा बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ग्रामोदय संघाच्या सभागृहात पार पडली. ग्रामसभेत लोकप्रतिनिधी तथा नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेत अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी संवर्ग विकास अधिकारी मानकर यांना सांगितले. विकासासाठी लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांच्यात खेलीमेळीचे वातावरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच कोणत्याही अडचणी असल्यास एक मित्र, एक सोबती म्हणून आपल्यापर्यंत त्या पोहचवाव्या, त्या सुचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल असेही आ. धानोरकर म्हणाले.
याप्रसंगी व्यासपिठावर पं.स. सभापती इंदू नन्नावरे, उपसभापती निशा रॉय, संवर्ग विकास अधिकारी मानकर, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पंचायत समितीचे सदस्य पंढरी चौधरी, शेखर रंगारी, सुधाकर आत्राम, भानुदास गायकवाड, सुधाकर नन्नावरे उपस्थित होते.
कृषी, लेखा, पंचायत, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, सिंचन, पाणीपुरवठा विभाग, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, एकात्मिक बाल विकास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा या विभागाच्या विभागनिहाय वाचन करण्यात येवून आलेल्या तक्रारीना उत्तरे देण्यात आली.
आरोग्य विभागातील सर्व अहवाल इंग्रजीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ते समजायला कठीण जातात ते अहवाल मराठीत का नाही, असा सवाल जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी उपस्थित केला. स्वॉईन फ्ल्यू आजाराबाबत काय उपाययोजना केली, तसेच शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जनजागृतीचे कार्यक्रम राबविलेला का? असे आ.धानोरकर यांनी विचारले असता, संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देवू शकले नाही. तालुक्यातील गुडगावच्या बाबतीत अधिकारी चुकीची व दिशाभुल करणारी माहिती देत असल्याचे माधव जिवतोडे म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)