आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले
By Admin | Updated: March 2, 2015 01:12 IST2015-03-02T01:12:16+5:302015-03-02T01:12:16+5:30
जखमी रुग्णांना रेफर करण्याची परंपरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच ...

आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले
वरोरा: जखमी रुग्णांना रेफर करण्याची परंपरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच याची दखल घेत आमदार धानोरकर यांनी विविध विभागाची आमसभा घेतली. या सभेत त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनाविले.
येथील बावणे मंगल कार्यालयात सर्वच शासकीय विभागाची आमसभा आमदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मंचावर पं. स. सभापती सुनंदा जिवतोडे, जि.प. सदस्य नितीन मत्ते, डॉ. विजय देवतळे, पं.स. उपसभापती गजानन चांदेकर, पं.स. सदस्य अविनाश ठेंगळे, नगरसेवक राजू महाराज, माजी पं.स. उपसभापती दत्ता बोरेकर, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार आदी उपस्थित होते.
आमसभेमध्ये अनेक गावातील अंगणवाडी इमारतीसाठी मागील वर्षी निधी प्राप्त झाला. तरीपण इमारती बांधकाम पूर्ण झाले नाही, ही बाब उपस्थित ग्रामस्थांनी आमदार बाळू धानोरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता, उत्तरे देताना उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछक होताना दिसली.
मार्च महिन्यापूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण करा तसेच बांधकामात दिरंगाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश दिले, आमदार धानोरकर यांनी यावेळी दिले.
त्यानंतर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराचा मुद्दा समोर येताच आ. धानोरकर यांनी ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत चांगलेच संतप्त झाले. वरोरा सारख्या उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह रेफर केले जात असतील तर ग्रामीण भागातील रुग्णालयाचा कारभार कसे चालत असणार, हे न विचारलेलेच बरे, असे सांगत मृतदेह ठेवण्याचे फ्रिजर दुरूस्त होणार करणार कधी, अतिरिक्त फ्रिजर का मागितले नाही, त्याचा पाठपुरावा केला काय, अशा अनेक प्रश्नाचा भडीमार आ. धानोरकर यांनी अधिकाऱ्यांवर केला.
मात्र, अधिकारी निरुत्तर होते. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही आमादर धानोरकर यांनी यावेळी दिला. सभेला अनेक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)