कोरोना उपाययोजनांबाबत आमदारांची उद्योग समूहाशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:13+5:302021-05-06T04:30:13+5:30
राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक ...

कोरोना उपाययोजनांबाबत आमदारांची उद्योग समूहाशी चर्चा
राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी सर्व कंपन्यांच्या माध्यमातून कोविडच्या काळात ग्रामीण भागातील जनतेकरिता सीएसआर फंडातून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आ. धोटे यांनी दिल्या.
सर्व कंपन्यांनी मिळून क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयासाठी एनआयव्ही व्हेन्टेलेशन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, जम्बो सिलिंडर, ऑक्सिजन फ्लोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, मल्टिपॅरा माॅनिटर आणि मेडिसीन्स इत्यादी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच वेकोलि, अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड आणि दालमिया या बड्या उद्योग समूहांना प्रत्येकी ५० बेडचे कोरोना केअर सेंटर आणि २० ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येक उद्योग समूहाने कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचीदेखील सूचना केली आहे.
आमदार सुभाष धोटे यांच्या आवाहनाला क्षेत्रातील सर्व स्थानिक उद्योग समूहांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांच्या सूचनेनुसार स्थानिक परिसरात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेरकी, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोणगावकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, वेकोलिचे सी. पी. सिंग, समीर भरले, डॉ. ओवेश अली, अल्ट्राटेकचे सचिन गोवारदिपे, डॉ. पाल, माणिकगड सिमेंटचे राजेश झाडे, अंबुजा सिमेंटचे श्रीकांत कुंभारे, दालमियाचे उमेश कोल्हटकर उपस्थित होते.