आमदारांना आली जाग, जखमीची भेट
By Admin | Updated: September 7, 2016 00:49 IST2016-09-07T00:49:10+5:302016-09-07T00:49:10+5:30
वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला.

आमदारांना आली जाग, जखमीची भेट
प्रकृतीची विचारपूस : एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन नोंदविली तक्रार
गोंडपिंपरी : वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला. घटनेची माहिती एफडीसीएमला देण्यात आली. तक्रार घेवून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली. पण सुट्टीचे कारण पुढे करीत तक्रार घेण्यास मज्जाव केला. कुणीही दखल घेत नसल्याने कार्यकर्त्यांनी आ. संजय धोटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पण त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. हा संतापजनक प्रकार ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून मंगळवारी समोर आणला. त्यामुळे आमदार व एफडीसीएमचे अधिकारी जागे झाले.
आ. संजय धोटे यांनी मंगळवारी थेट रूग्णालय गाठून जखमी युवकाची विचारपूस केली. तर एफडीसीएमचे अधिकारी जखमीच्या घरी पोहोचून तक्रार नोंदवून घेतली. आमदार धोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली व तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
रविवारी साईनाथ रामजी येलमुले (२७) हा युवक जंगलात गुरे चारत असताना त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. बचावासाठी तो रांजीच्या झाडावर चढला असता वाघाने त्याचा पाय पकडून ओढत नेले. याचवेळी वडील घटनास्थळी पोहचून आरडाओरड केल्याने व जनावरांचा कळप आल्याने वाघाने साईनाथला सोडून कळपाकडे धाव घेतली. घटनेची माहिती कळताच गावातील काही कार्यकर्त्यांनी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, कार्यालयातही गेले. घटनेची तक्रार घेवून पंचनामा करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी सुट्टीचे कारण पुढे करत तक्रार घेण्यास नकार दिला.
वारंवार विनंती करूनही त्यांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची प्रथमता धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमीला उपचारासाठी दाखल केले. त्यांची गंभीर अवस्था बघता त्याला गोंडपिंपरीवरुन चंद्रपूरला रेफर करण्यात आले. पण पैशाअभावी त्याला स्वगावी परतावे लागले. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी साईनाथची कुणीच दखल घेत नसल्याने आमदार संजय धोटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र तेही प्रतिसाद न देता वारंवार फोन कापत होते. हा प्रकार संतापजनक होता.
आमदारांनी उदासिनता दाखविल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी बाहेर तालुक्यातील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलाविले व साईनाथला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका गरीब गुराख्याला मदतीसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनता ‘लोकमत’ने समोर आणली. लोकमतच्या वृत्ताने साईनाथच्या कुटुंबियांची तक्रार घेण्याकरीता एफडीसीएमचे अधिकारी थेट त्याच्या टोले नांदगावात पोहोचले. पत्नीच्या नावाने तक्रार नोंदवून घेत घटनेचा पंचनामाही केला. (शहर प्रतिनिधी)