पैशाच्या वादातून मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:32 IST2017-11-26T00:32:32+5:302017-11-26T00:32:43+5:30
जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली.

पैशाच्या वादातून मित्राची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली. सोनू सेवकराम शर्मा (२८) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंकर झाडे रा. महाकाली कॉलरी (२८) याला ताब्यात घेतले आहे.
शंकर झाडे व सोनू शर्मा हे दोघे मित्र होते. दोन दिवसांपूर्वी जुगार खेळताना सोनू शर्माने शंकरचे पैसे दिले नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, आज सकाळी शंकरने सोनूच्या घराकडे जाऊन त्याला पैशाबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी शंकरने सोनूला लाठीकाठीने मारहाण करुन धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. यामध्ये सोनू गंभीर जखमी झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शंकर झाडे याला महाकाली कॉलरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार एस. एस. भगत करीत आहेत.