जिल्हा परिषदेच्या १२६ शाळांत ‘मिशन नवचेतना’ अभियान
By Admin | Updated: November 3, 2015 00:20 IST2015-11-03T00:20:13+5:302015-11-03T00:20:13+5:30
जिल्हा परिषद शाळेत खासगी शाळांच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशातून मिशन नवचेतना राबविले जात आहेत.

जिल्हा परिषदेच्या १२६ शाळांत ‘मिशन नवचेतना’ अभियान
नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी : चंद्रपूर जिल्हा परिषद पहिली
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळेत खासगी शाळांच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशातून मिशन नवचेतना राबविले जात आहेत. जिल्ह्यात १३६ शाळांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.
मिशन नवचेतना उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संनियंत्रण यंत्रणा, विषयनिहाय बिग्रेड तसेच थिकटँकची नियुक्ती करण्यात आली आहे. सनियंत्रण समितीमध्ये जिल्हास्तरावर ११ सदस्य असून ही समिती प्रत्येक तीन महिन्यात कार्यक्रमाचा आढावा घेऊन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणार आहे. जिल्हास्तरावर नवचेतना मिशनची थिंकटँक असणार आहे. यात शिक्षण तज्ञ, संशोधक, प्रयोगशील शिक्षक व अधिकारी यांचा समावेश आहे. या थिकटँकमार्फत मराठी, गणित, इंग्रजी ब्रिगेड गटातील सदस्यांना विषयासंदर्भात समृद्ध करणे, मिशन नवचेतनांतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन व आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे आणि शाळा स्तरावरुन प्राप्त सूचनाप्रमाणे कार्यक्रमाची दिशा ठरविली जाणार आहे.
मिशनचे नियोजन १५ तालुक्यातील ११३ केंद्रावर सुरू आहे. प्रत्येक महिन्यात प्रत्येक केंद्रावर संमेलन आयोजित केले जाते. केंद्र संमेलनात मराठी, गणिव व इंग्रजी विषयाच्या मूलभूत क्षमतांच्या विकासासंदर्भात चर्चा करणे, शिक्षकांना वर्ग अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणे व केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा सन्मान करुन त्याचे अनुभव ऐकण्याची संधी उपलब्ध करुन देणे असे नियोजन मिशन अंतर्गत आखण्यात आले आहे.
निवड करण्यात आलेल्या १३६ शाळा लोकसहभागातून मॉडेल स्कूल करण्यात येणार आहे. तसेच ज्ञानरचना वाद पद्धतीने शाळा प्रगत करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीने व शिक्षकांमध्ये अध्ययन अध्यापनात उत्तम जाण निर्माण करण्याचा मिशन नवचेताचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे मिशन जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उंचीवर नेऊन ठेवणारे ठरणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)