पालावरच्या शाळेतील बेपत्ता विद्यार्थी वर्धा जिल्ह्यात गवसले
By Admin | Updated: December 25, 2015 00:23 IST2015-12-25T00:23:01+5:302015-12-25T00:23:01+5:30
पिढ्यानंपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणाचा आजच्या पिढीला गंध नाही. अशा ५० मुल-मुलींंना वरोरा पंचायत शिक्षण विभागाने सोबत घेवून वरोरा येथे पालावरची शाळा...

पालावरच्या शाळेतील बेपत्ता विद्यार्थी वर्धा जिल्ह्यात गवसले
जाम येथे शाळा सुरू : शिक्षण विभागाला यश
वरोरा : पिढ्यानंपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणाचा आजच्या पिढीला गंध नाही. अशा ५० मुल-मुलींंना वरोरा पंचायत शिक्षण विभागाने सोबत घेवून वरोरा येथे पालावरची शाळा सुरू करीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले. महिनाभर शाळा सुरू राहिली. मात्र एका रात्री विद्यार्थी बेपत्ता झाले होते. या बेपत्ता विद्यार्थ्यांचा वरोरा पंचायत समिती शिक्षण विभागाने वर्धा जिल्ह्यात शोध घेवून तेथील शिक्षण विभागाशी सन्मवय साधला व जाम येथे पालावरची शाळा सुरू केली आहे.
दिवाळीच्या पूर्वी वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये २५ भटकंती कुटुंब वास्तव्यास आले. भटकंती कुटुंबातील पुरुष मंडळी दिवसभर जडीबुटी विकायचे महिला व मूल दिवसभर झोपड्यावर राहायचे. या झोपड्यामध्ये ५० मुले-मुली होते. गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते यांनी भटकंती करणाऱ्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळीक साधत ते जिथे वास्तव्यास आहे, त्याठिकाणी दिवाळीच्या दिवसात पालावरची शाळा सुरू केली.
दररोज शिक्षक येवून मुलांना शिस्तीचे धडे व त्यांच्या भाषेत शिकविणे सुरू केले. लोक सहभाग व शिक्षण विभागाच्या वतीने पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भटकंती करणारे कुटुंबे असल्याने ते एक दिवस निघून जातील व त्यांच्या शिक्षणात खंड पडणार अशी भीती होती. परंतु, याची पंचायत समितीच्या विषय तज्ञांना तमा नव्हती. त्यांनी आपले विद्यार्जनाचे काम सुरू ठेवले. गाव सोडून जाताना त्यांच्या पालकांना विषयतज्ञ पुर्व वारंवार सूचना देत होते. परंतु, एकाच रात्रीत पालावरची शाळा, विद्यार्थी व त्यांचे कुटुंब बेपत्ता झाले.
शिक्षक नियमित वेळेवर गेले असता, सर्वच बेपत्ता झाल्याचे दिसून आल्याने शिक्षक काही काळ हिरमुले होते. अचानक विद्यार्थी निघून गेल्याने त्यांना पुढील शिक्षणाकरीता देण्यात येणारे शिक्षण हमीपत्रही देण्यात आले नाही. मात्र या कुटुंबांचा शोध घेण्यात यश आले असून जाम येथे पालावरची शाळा सुरू करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
एक महिना शिकविल्यानंतर मुले अचानक बेपत्ता झाल्याने निराश झालो होतो. परंतु त्यांचा शोध घेवून त्यांच्याकरीता जाम येथे पालावरची शाळा सुरू करण्यात यशस्वी झालो व ते विद्यार्थी जाम येथे शिक्षण घेत असल्याचे प्रत्यक्ष बघून आनंद झाला.
- खुशाल पाचभाई
विषयतज्ञ्ज, वरोरा पं.स.