बेपत्ता मुलाचा शोध लागलाच नाही

By Admin | Updated: November 22, 2015 00:51 IST2015-11-22T00:51:14+5:302015-11-22T00:51:14+5:30

मूल तालुक्यातील येरगावच्या चौधरी कुटुंबीयांना वर्षभरापासून आपल्या एकुलत्या एक लेकराची घरी परतण्याची प्रतीक्षा लागून आहे.

The missing son was not found | बेपत्ता मुलाचा शोध लागलाच नाही

बेपत्ता मुलाचा शोध लागलाच नाही

वर्षभरापूर्वी पोलिसांत तक्रार : मुलाच्या प्रतीक्षेत आईचा टाहो
गोंडपिपरी : मूल तालुक्यातील येरगावच्या चौधरी कुटुंबीयांना वर्षभरापासून आपल्या एकुलत्या एक लेकराची घरी परतण्याची प्रतीक्षा लागून आहे. ३४ वर्षीय अंबादास भाऊजी चौधरी हा युवक बेपत्ता असून सदर प्रकाराची तक्रार मूल पोलिसांकडे करण्यात आली. परंतु, वर्षभरानंतरही त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, पतीच्या निधनानंतर खचलेली अंबादासची आई मात्र लाडक्या लेकराच्या प्रतीक्षेत टाहो फोडत आहे.
मूल तालुक्यातील येरगाव येथील अंबादास चौधरी हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार त्याची आई जाईबाई भाऊजी चौधरी यांनी मूल पोलिसांकडे केली होती. जाईबाईचा पती मागील काही वर्षापूर्वीच स्वर्गवासी झाल्याने त्यांच्या कुटुंबात जाईबाईसह अंबादास हे दोघेच राहत होते. अशात अंबादासचे लग्न जुळले व विवाहानंतर आई व पत्नीसह अंबादास सुखाने संसार सांभाळीत होता. या दरम्यान अचानक अंबादासचे पत्नीशी वितुष्ट निर्माण झाल्याने ती आपल्या माहेरी निघून गेली. बऱ्याच दिवसांपर्यंत पत्नी अंबादासकडे परतलीच नाही. यामुळे अंबादासच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला. याच मानसिकतेतून तो बऱ्याचदा मुल येथे ये-जा करीत होता. दरम्यान, अंबादासच्या मानसिकतेमध्ये कुठलाच बदल होताना दिसून आला नाही. अशातच २ नोव्हेंबर २०१४ रोजी अंबादास नेहमी प्रमाणे मूल येथे गेला असता तो अजूनपर्यंत परतलाच नाही. सुरुवातीलाच पतीने साथ सोडली आणि आता एकुलता एक वारस असलेला मुलगासुद्धा दूर गेल्याने जाईबाईपुढे आता कुणाचाच आधार उरला नाही. ती आजही मुलाच्या प्रतीक्षेत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The missing son was not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.