वनविकास महामंडळात गैरप्रकार

By Admin | Updated: June 5, 2015 01:13 IST2015-06-05T01:13:49+5:302015-06-05T01:13:49+5:30

मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारशाह अंतर्गत वनक्षेत्रातील विविध क्षेत्रीय कामात प्रचंड गैरप्रकार होत असल्याची माहिती आहे.

Misconduct in Vanvikas Mahamandal | वनविकास महामंडळात गैरप्रकार

वनविकास महामंडळात गैरप्रकार

कोठारी : मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारशाह अंतर्गत वनक्षेत्रातील विविध क्षेत्रीय कामात प्रचंड गैरप्रकार होत असल्याची माहिती आहे. मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प बल्लारशाह अंतर्गत झरण, कन्हारगाव, तोहगाव व धाबा वनपरिक्षेत्र आहेत. या क्षेत्रात वनाचा विकास करण्याकरिता दरवर्षी रोपवन घेतले जाते. या रोपवनाच्या कामासाठी गोरगरीब जनता जात असते. त्यांना कधीही शासकीय नियमाप्रमाणे मजुरी देण्यात येत नाही. त्यांना कुठल्याही सवलती देण्यात येत नाही. उलट कमी पैशात जास्त काम काढण्यासाठी त्यांना राबवून घेतले जाते. अनेक मजुरांच्या नावाने हजेरी पत्रकावर जास्त दिवसांची हजेरी भरली जाते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मुळ हजेरीपत्रक नसते. कच्च्या हजेरीपत्रकावर मजुरांची नोंद घेण्यात येते व वेतनासाठी वेगळे हजेरीपत्रक बनवून मजुरांच्या कामाच्या दिवसापेक्षा जास्त दिवसांची नोंद घेण्यात येते. पगार देताना कोऱ्या हजेरी पत्रकावर मजुरांच्या सह्या-अंगठे घेतले जातात व कच्च्या पगारपत्रकावरून पगार देण्यात येते. त्यानंतर मुळ हजेरीपत्रक भरून शासनाला देण्यात येतात. असा प्रकार विविध कामात होत असून महामंडळाला दरमहा लाखो रुपयांचा चुना लावण्याचा सपाटा सुरू आहे. या प्रकाराची वाच्यता करणाऱ्या मजुरांना कामापासून मुकावे लागत असल्याने अधिकाऱ्यांच्या दडपणात मिळेल त्या मजुरीत मजूर कामे करीत असतात. झरण मध्यवर्ती रोपवाटिकेत काम करणाऱ्या मजुरांना कमी वेतन देवून शोषण केले जाते, अशी मजुरांची तक्रार आहे. (वार्ताहर)
‘विडिंग’च्या कामात मोठा भ्रष्टाचार
महामंडळाने हजारो हेक्टर वनात रोपवन केलेले आहे. यात दरवर्षी (निंदणी) विडींग केली जाते. यात रोपवनात कचरा होऊ नये व रोपांची चांगली वाढ व्हावी, भरपूर सुर्यप्रकाश मिळावा, हा हेतु असतो. त्यासाठी द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवे, सहावे अशाप्रकारे निंदण केले जाते. मात्र यावर्षी तसेच मागील वर्षी कुठेही विडींग करण्यात आलेले नाही. फक्त देखाव्यासाठी दर्शनी भागात विडींग करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आतील भागात विडींग करण्यात येत नाही. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी बोगस मजूर दाखवून खर्ची केल्याची माहिती आहे. यात अधिकारी स्वत: मलिंदा लाटत आहेत.
आगीत हजारो बांबू स्वाहा
झरण, कन्हारगाव, तोहगाव व धाबा वनक्षेत्रात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात जंगलाला आगी लागून त्यात ४० हजार लांब बांबू, तसेच बिट, फाटे जळाले. यात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार बांबु कामगाराचे योग्य पगार न दिल्याने वनाधिकारी व मजुरात खडाजंगी उडाली. त्यातून हा प्रकार घडला.
बांबू कामातही गैरप्रकार
या प्रकल्पात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बांबुची कटाई केली जाते. त्यासाठी परप्रांतातील मजुरांची आयात करून कमी दरात कामे केली जातात व त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला जातो. वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात बांबुची कटाई करून ठेकेदारांशी हातमिळवणी करून बांबुची परस्पर विल्हेवाट लावली जाते. त्यात अधिकारीही सहभागी असतात.
चौकशी थंडबस्त्यात
कन्हारगाव विक्री आगारातून बांबू परस्पर विकल्याची चर्चा सर्वश्रुत आहे. त्यास अनेकांनी दुजोरा दिला. मात्र या प्रकाराची चौकशी केलेली नाही. उलट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ डेपो अधिकाऱ्यांचा कार्यभार काढण्यात आला. मात्र प्रत्यक्ष चौकशी झालीच नाही.

Web Title: Misconduct in Vanvikas Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.