झोन कार्यालये होणार मिनी मनपा

By Admin | Updated: August 7, 2014 23:51 IST2014-08-07T23:51:57+5:302014-08-07T23:51:57+5:30

चंद्रपूर शहराचा विस्तार बघता झोन कार्यालयातच बदल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डावॉर्डातील नागरिकांना आपल्या कामासाठी मनपाच्या कार्यालयात हेलपाटे खावे लागू नये

Mini office will be held in Zone Offices | झोन कार्यालये होणार मिनी मनपा

झोन कार्यालये होणार मिनी मनपा

संगणकीकरणाचाही प्रस्ताव : नागरिकांची सर्व कामे आता झोन कार्यालयात
चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा विस्तार बघता झोन कार्यालयातच बदल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डावॉर्डातील नागरिकांना आपल्या कामासाठी मनपाच्या कार्यालयात हेलपाटे खावे लागू नये म्हणून त्यांची सर्व कामे झोन कार्यालयातच होतील, अशी सुविधा निर्माण केली जात आहे. त्यामुळे आता लवकरच झोन कार्यालयच मिनी महानगरपालिका झाल्याचे दिसणार आहे.
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर आता शहराचा विस्तार निश्चित झाला आहे. पुढे मनपा हद्दीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाकडे पाठविला आहे. अशावेळी नागरिकांना शहरातील कोणत्याही भागातून किरकोळ कामासाठी गांधी चौकातील महानगरपालिकेच्या कार्यालयात यावे लागते. घाणीची समस्या असो, पाण्याबाबतची तक्रार असो वा जन्म-मृत्यू दाखल काढायचा असो, प्रत्येक वेळी नागरिकांना गांधी चौक गाठावे लागते. यात नागरिकांचा वेळ तर जातोच; नाहक आर्थिक भुर्दंडही बसतो.
तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड असताना शहरात तीन झोन कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी झोन प्रमुख म्हणून अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ शहरातील स्वच्छतेसंबंधीचीच कामे या झोन कार्यालयात केली जायची. मात्र आता आयुक्त सुधीर शंभरकर यांनी झोन कार्यालयातच नागरिकांची सर्व कामे होतील, अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. अभियंता हे पद टेकनिकल असते. नागरिकांशी त्यांचा सरळ संबंध येत असल्याने त्यांना तिथून हटवून आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना झोन प्रमुख म्हणून नियुक्त केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी दोन-तीन लिपिकही नियुक्त केले आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, जन्म-मृत्यू, कराचा भरणा, बांधकाम व इतर विभागातील सर्व कामे झोन कार्यालयातच होतील या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. झोन कार्यालयात दुरध्वनीची सुविधाही देण्यात आली आहे. लवकरच हे कार्यालयाचे संगणकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना कुठलेही प्रमाणपत्र वा तक्रारी करण्याकरिता गांधी चौकातील मनपाच्या कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या तक्रारीचे त्यांच्या वॉर्डासाठी असलेल्या झोन कार्यालयात निवारण होणार आहे. मनपाच्या सातमजली इमारतीत केवळ कामांचे नियोजन केले जाईल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mini office will be held in Zone Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.