लाखो रूपयांचा वनऐवज जंगलात विखुरलेला

By Admin | Updated: July 6, 2017 00:47 IST2017-07-06T00:47:19+5:302017-07-06T00:47:19+5:30

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील हंगामात वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत चारही वनक्षेत्रात लांब बांबु बंडल,....

Millions of rupees are scattered throughout the forest | लाखो रूपयांचा वनऐवज जंगलात विखुरलेला

लाखो रूपयांचा वनऐवज जंगलात विखुरलेला

वनाधिकारी कुंभकर्णी झोपेत : वाहतुकीअभावी महामंडळाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील हंगामात वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत चारही वनक्षेत्रात लांब बांबु बंडल, साग इयादी इमारती लाकडे, साग व इतर सिसम बिटाच्या निष्कासनाचे कामे निर्धारित जंगल कक्षात करण्यात आली. निष्कासनाचा वनऐवज पावसाळ्यापूर्वी विक्री आगारात वाहतूक होणे आवश्यक होते. मात्र भर पावसात अनेक कक्षात वनऐवज विखुरलेला असल्याची बाब समोरर आली आहे.
मागील वर्षाच्या हंगामात कक्ष क्र. १६ मध्ये मोठ्या प्रमाणात लांब बांबु, विक्री आगारात वाहतूक न केल्याने मालाची पत घसरली. त्यात महामंडळाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. या बाबीकडे वर्षभर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. वर्षभरानंतर हा प्रकार मे महिन्यात उघडकीस आला. त्यामुळे लाखो रूपये खर्च केलेला वनऐवज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महामंडळाला नुकसान सहन करावे लागले.
या प्रकाराबाबत संबंधित वनरक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. असा प्रकार चालु वर्षात घडू नये यासाठी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कामाच्या क्षेत्राची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी निष्कासनाचा वनऐवज वाहतूक करण्याची खबरदारी, दक्षता घेणे आवश्यक होते. मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात लांब बांबु, बांबु मोळ्या, साग इमारती, आडजात इमारती साग बिट, आडजात बिट जंगलात शिल्लक अस्तव्यस्त विखुरलेले पडून आहे. पावसाने सध्या जोर पकडला असून जंगलातील लाखो रूपयांचा ऐवज पाण्यात सडत आहे.
सडलेल्या व खराब झालेल्या ऐवजाची पत घसरून महामंडळाला योग्य किंमत मिळणार नाही. यामुळे महामंडळाचे लाखो रूपयाचे नुकसान यावर्षीही होणे अपेक्षित आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच झाले आहे.

अधिकाऱ्यांची चुप्पी
जंगलात पडून असलेला वनऐवज त्वरीत विक्री आगारात वाहतूक करण्याच्या कामाला गती देण्यापेक्षा सध्या अधिकारी व कर्मचारी रोपवन वृक्षलागवड करण्यात मग्न आहेत. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वन अधिकारी चुप्पी साधून आहेत.

Web Title: Millions of rupees are scattered throughout the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.