जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: April 12, 2016 03:35 IST2016-04-12T03:35:24+5:302016-04-12T03:35:24+5:30
गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
नागभीड : गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून निघणारे पाण्यामुळे राज्य महामार्गालगत खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नागभीड ग्रामपंचायत प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. ही जलवाहिनी तातडीने दुरूस्त करून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.
नागभीड शहरातील जलकुंभाला पाणी पुरवठा करण्यासाठी नागभीड - नागपूर महामार्गावर विहीर व पंपहाऊस आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंपहाऊस जवळील मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच फुटलेल्या जलवाहिनीतून निघणाऱ्या पाण्याने खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा राज्य महामार्गाला लागून असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
जलवाहिनीतून वाया जाणाऱ्या पाण्याने जलकुंभ भरण्याकरिता वेळ लागत असल्याने विद्युत खर्चसुद्धा वाढत आहे. पाणीपट्टी कर व विद्युत कर आकारणीचे माध्यमातून हा संपूर्ण खर्च नागरिकांकडून वसुल होत असल्याने येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे नळाला कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करित असल्याने रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. जनतेला पाण्याचे महत्व सांगणारे ग्रामपंचायत प्रशासनाची अवस्था दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण अशीच झाली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागभीडकरांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)