सुरक्षा रक्षक हटविल्याने लाखोंचा कोळसा चोरी
By Admin | Updated: July 13, 2017 00:39 IST2017-07-13T00:39:02+5:302017-07-13T00:39:02+5:30
वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात.

सुरक्षा रक्षक हटविल्याने लाखोंचा कोळसा चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात. कोळसा माफीयांच्या आपसी संघर्षात या क्षेत्रात खून सुद्धा झाले होते. वेकोलिचे सुरक्षा रक्षक व खाजगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक यांची चोवीस तास सुरक्षा असताना सुद्धा कोळसा व लोखंड चोरीवर पायबंद घालण्यास वेकोलि अधिकारी यशस्वी झाले होते. मात्र आता संपूर्ण खाजगी सुरक्षा रक्षकच वेकोलि वणी क्षेत्र परिसरातून काढून टाकले असल्याने कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्यांना सर्व मार्ग मोकळे झाले आहे, अशी तक्रार राजू कुकडे यांनी पोलिसांत केली आहे.
७ जूनपासून वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस, निलजई, नायगाव, मुंगोली, कोलगाव व पैनगंगा कोळसा खाणी क्षेत्रातील खाजगी सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी केल्याने या क्षेत्रातील कोळसा माफीया व लोखंड चोर सक्रीय झाले आहेत. त्यांनी लाखो रुपयाचा वेकोलिचा माल चोरी केला आहे. मात्र असे असले तरी कोणत्याही वेकोलि अधिकाऱ्यांनी कोळसा व लोहा चोरी विषयी पोलिसांत तक्रार दिली नसल्याने या अगोदर झालेल्या मोठ्या कोळसा चोरीची भरपाई करण्यासाठी किंवा कोळसा चोरीतून लाखो रुपये जमा करण्यासाठी तर खाजगी सुरक्षा रक्षक हटविले नसावे ना, अशी शंका निर्माण होत आहे.
राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम लुट होत असताना खाजगी सुरक्षा रक्षक हटवून वेकोलि प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे. हेच समजायला मार्ग नाही. लाखो रुपयाच्या कोळसा चोरीस वेकोलि अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एसपींना दिलेल्या तक्रारीत राजू कुकडे यांनी केली आहे.