सुशिक्षित बेरोजगारांचे कामाअभावी स्थलांतर

By Admin | Updated: May 30, 2017 00:36 IST2017-05-30T00:36:54+5:302017-05-30T00:36:54+5:30

जिल्ह्यात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण ...

Migration of educated unemployed workers due to lack of | सुशिक्षित बेरोजगारांचे कामाअभावी स्थलांतर

सुशिक्षित बेरोजगारांचे कामाअभावी स्थलांतर

औद्योगिक तालुका : अनेकांची महानगरांकडे धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : जिल्ह्यात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व मजुरांनी कामाअभावी अनेक ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यात पुणे, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बंगरूळू, दिल्ली या मोठ्या महानगराकडे अधिक कल दिसून येत आहे.
कोरपना तालुका हा नैसर्गिकदृष्ट्या माणिकगड पहाड व पैनगंगा - वर्धा नदीच्या खोऱ्यात वसला आहे. त्यामुळे या तालुक्याच्या निम्म्या पट्ट्यात सुपीक शेतजमीन तर दुसरीकडे डोंगराळ माळरान आहे. तालुक्यात असलेले चार सिमेंट उद्योग, एक कोळसा खाण व शेती हे रोजगाराचे प्रभावी साधन आहे. मात्र दिवसेंदिवस यांत्रिकीकरणामुळे या उद्योगातही मनुष्याचे काम उरले नाही. त्यातच दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. झपाट्याने होणारा लोकसंख्या विस्तारामुळे अधिकच भर पडत आहे. कोरपना परिसर हा शेती व जिनिंग उद्योग व गडचांदूर, नांदा, सिमेंट उद्योगासाठी ओळखला जातो तरी देखील येथील स्थानिक उद्योगात रोजगाराच्या संधी उरल्या नाही नव्या उद्योगांची पाहिजे तेवढी पायाभरणी न झाल्याने उद्योगांच्या आशाही धूसरच ठरत आहे. पहाडी क्षेत्रात तर रोजगाराची कुठलीच संधी नसल्याने या भागात नव्या उद्योगाची पायाभरण होणे येथील विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र याकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष तेवढेच कारणीभूत ठरत आहे. या भागात एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभारल्यास रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त होईल.

अनेक उद्योग बंद
कोरपना तालुक्यात चार सिमेंट उद्योग, एक कोळसा खाण, सहा जिनिंग प्रेसिंग उद्योग, एक डोलोमाईट माईन्स आहे. परंतु यातील एक सिमेंट उद्योग, दोन जिनिंग प्रेसिंग, एक डोलोमाईट माईन्स गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्याने या उद्योगातील बेरोजगारांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी येथे बेरोजगारी वाढली आहे. त्यातच या भागात परप्रांतीय मजूरही स्थिरावले आहेत. त्यामुळे कामासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
आश्वासनाची पूर्तता व्हावी
तालुक्यात सूतगिरणी व इतर उद्योग उभारण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र त्यापैकी कोणत्याही उद्योगांची पायाभरणी अद्याप करण्यात आलेली नाही. तेव्हा या दृष्टीने प्रयत्न करून आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Migration of educated unemployed workers due to lack of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.