बापरे ! शालेय पोषण आहारातील तांदूळ शिजता शिजत नाही, मात्र तव्यावर वितळतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 21:04 IST2022-02-22T21:03:35+5:302022-02-22T21:04:35+5:30
Chandrapur News घुग्घुस नजीकच्या ऊसगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यातील तांदूळ शिजतच नाही. पाण्यात टाकून ठेवला तर भिजतही नसल्याने सदर तांदूळ प्लास्टिकचा असावा, अशी चर्चा गावात आहे.

बापरे ! शालेय पोषण आहारातील तांदूळ शिजता शिजत नाही, मात्र तव्यावर वितळतो
चंद्रपूरः घुग्घुस नजीकच्या ऊसगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यातील तांदूळ शिजतच नाही. पाण्यात टाकून ठेवला तर भिजतही नसल्याने सदर तांदूळ प्लास्टिकचा असावा, अशी चर्चा गावात आहे. पोषण आहार निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याच्या तक्रारीसुध्दा यावेळी गावकऱ्यांनी केल्या.
यासंदर्भात घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी हे विद्यार्थ्याच्या पालक व पत्रकारांसह गावात पोहोचले आणि चौकशी केली. उसगांवच्या जिल्हा परिषद शाळेत १ ते ८ वर्ग असून ६९ विद्यार्थी आहेत. गेल्या जुलैपासूनच्या पोषण आहाराचे सोमवारी शाळेतून विद्यार्थ्यांना १४ किलो तांदूळ, चार किलो मूगदाळ व चार किलो मोट वाटप करण्यात आले. त्या तांदळात दुसरा तांदूळ मिसळण्यात आला आहे. तो तांदूळ शिजत नाही व पाण्यात भिजत नसल्याने मिसळलेला तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याची चर्चा आहे.
ऋषी सदाफले नावाच्या विद्यार्थ्याच्या पालकाने तांदूळ शिजत नाही म्हणून तांदूळ ताव्यावर गरम करून पाहिला. ताव्यावर तो तांदूळ अक्षरश: वितळल्याचे सदाफले यांनी सांगितले.
यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापक पी. एम. कुमरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता आलेला तांदूळ, मुगाची दाळ, मोट आम्ही काल वाटप केले. मंगळवारी सकाळी तांदळात प्लास्टिकचे तांदूळ असल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. ठेकेदारांना विचारले असता ५० किलो तांदळात विद्यार्थ्याच्या बौद्धिक वाढ व्हावी, यासाठी शासनाकडूनच अडीच किलो हा पौष्टिक तांदूळ मिळविण्यात येत असल्याचे सांगितले. तर सरपंच निविता ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
शासनाचा आदेशान्वये पौष्टिक आहार म्हणून ५० किलो तांदळामध्ये अडीच किलो सदर तांदूळ मिळविण्याची तरतूद आहे. सदर तांदूळ हा आयएफडीकडून पुरवठा करण्यात येत आहे.
- देशमुख, पुरवठा अधीक्षक, शालेय पोषण आहार, जि. प. चंद्रपूर