अनेकांना आधार देणारी ‘ती’ घेणार निरोप
By Admin | Updated: January 17, 2016 00:54 IST2016-01-17T00:54:29+5:302016-01-17T00:54:29+5:30
गेली ५० वर्ष तीने उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत अनेकांना आधार दिला. याचवेळी टिकेचे आणि प्रशंसेचे प्रसंगही अनुभवले.

अनेकांना आधार देणारी ‘ती’ घेणार निरोप
४९ वर्षांचा इतिहास : टीका आणि प्रसंशेचे प्रसंगही अनुभवले
घनश्याम नवघडे नागपूर
गेली ५० वर्ष तीने उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत अनेकांना आधार दिला. याचवेळी टिकेचे आणि प्रशंसेचे प्रसंगही अनुभवले. पण तिची उपयोगिता आता काहिशी संपुष्टात आली आणि त्यामुळेच तिचा आता निरोप घ्यावा लागत आहे.
येथील पंचायत समितीच्या इमारतीची ही व्यथा आहे. नागभीड तालुक्याची निर्मिती १९८१ मध्ये झाली असली तरी पंचायत समिती त्यापुर्वीची म्हणजे १९६० ची आहे. ल.मा. गुरुपुडे हे या पंचायत समितीचे प्रथम सभापती. त्यांच्याच कार्यकाळात येथील पंचायत समितीचे बांधकाम करण्यात आले. २४ डिसेंबर १९६६ रोजी पंचायत समितीच्या या इमारतीचा शिलान्यास झाला होता. या शिलान्यासाठी त्यावेळेचे श्रममंत्री नरेंद्र तिडके आणि जि.प. चे अध्यक्ष अब्दुल शफी आले होते.
तीन चार वर्षात या इमारतीची काम पूर्ण झाल्यानंतर १९६९ मध्ये तिचे लोकार्पण झाले. तेव्हापासून ही इमारत लोकांच्या सेवेत होती. विटा आणि कौलारू पद्धतीची ही इमारत आजवर अनेकांना आश्रय देत आली. कितीतरी चाकरमाने या इमारतीमधूनच लोकांची कामे पूर्ण करीत होते. या काळात अनेक सभापती आणि सदस्य यांचा पदस्पर्शही या इमारतीस झाला. तालुक्यातील लोकांसाठी विविध शासकीय योजना याच इमारतीमधून राबविण्यात आल्या. एवढेच नाही तर लोकांनीही या इमारतीमध्ये येवून आपली गाऱ्हाणी, अडचणी सभापती, पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे विषद केल्या व न्याय आपल्या पदरात पाडून घेतला.
ही इमारत अशाप्रकारे अनेकांची सुख दुखाची साक्षीदार आहे. त्याप्रमाणे या इमारतबाबतही झाले. तिची उपयोगिता दिवसेंदिवस संपुष्टात येवू लागली. त्यामुळे या इमारतीला निर्लेखित करुन त्याऐवजी काळानुरुप नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी आली. मंजुरी आल्यानंतर ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.