गणरायाच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश
By Admin | Updated: August 25, 2016 00:42 IST2016-08-25T00:42:41+5:302016-08-25T00:42:41+5:30
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत.

गणरायाच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानातून प्रबोधन : तालुकास्तरासह विभागावर मिळणार पारितोषिक
चिमूर : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या टिळकांच्या उद्गाराचे चालु वर्षे हे शतक महोत्सवी वर्षे आहे. या नेत्यांची जीवनगाथा व कार्य विविध माध्यमाद्वारे जनतेपर्यंत प्रामुख्याने तरुणांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने गणेशउत्सव दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. गणेशोत्सव दरम्यानच गणरायांच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश देण्यात येणार आहे.
‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ हा उपक्रम येणाऱ्या गणेश उत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरू केली. या उत्सवादरम्यान शासनाने या वर्षांपासून उपक्रमाद्वारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीयस्तरावर घेण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गणेश मंडळास गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयाबाबत समितीकडून मूल्यांकन करून शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळास रोख बक्षिसासह गौरव करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेश मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाव, व्यसनमुक्ती व जनसंवर्धन यापैकी एका कल्पनेवर आधारीत देखावा करणे आवश्यक राहणार आहे. या स्पर्धेत धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेले मंडळांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता २९ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येणार आहे.
सध्या अनेक मानवनिर्मीत समस्या असून या सर्व समस्या माणसाच्या प्रबोधनातूनच कमी होवू शकतात. तर देशात व राज्यात स्त्री भ्रृणहत्या, महिलावरील अत्याचार आजही कमी झाले नाही. त्यामुळे शासन अनेक प्रबोधनाचे उपक्रम राबवित आहे. या वर्षाच्या गणेशोत्सवापासून तर शासनाकडूनन या समस्येच्या जनजागृतीसाठी गणरायाच्या माध्यमातूनच ‘बेटी बचाव’ चा संदेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
असे असणार पुरस्कार
विभागीय स्तरावरील प्रथम विजेत्यास दोन लाख रुपये, द्वितीय विजेत्यास एक लाख ५० हजार रुपये तर तृतीय विजेत्यास एक लाख रुपये रोख, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्या मंडळास एक लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार रुपये रोख, तालुकास्तर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय १० हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
तालुकास्तरीय त्रिसदस्यीय परीक्षण समिती
या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी राहतील. तर तालुक्यातील शाळा महाविद्यालयाचे कला शिक्षक किंवा प्राध्यापक तथा एन.एस.एस.च्या प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान प्रत्यक्ष भेट देवून शासनाने ठरविल्यानुसार मूल्यांकन करणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील किमान पाच मंडळानी भाग घेणे आवश्यक राहणार आहे. पाच पेक्षा जास्त मंडळे असेल तर तीन पुरस्कार, चार मंडळानी भाग घेतला तर दोन बक्षीस तर तिनच मंडळानी भाग घेतला तर फक्त प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे.