दुकानदारांच्या वजनात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:27+5:302021-07-23T04:18:27+5:30
चंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ...

दुकानदारांच्या वजनात घोळ
चंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केला जात असून, अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले; मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
चंद्रपुरात एमआरपीपेक्षा जास्त दराने अनेक खाद्य पदार्थ, वस्तू यांची विक्री होते का, याबाबत लोकमतने बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. विविध दुकानात जाऊन पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व साबणाची खरेदी केली. यावेळी दुकानदारांनी एमआरपी किंमतच घेतली.
मात्र बाजारपेठेत फिरताना आणखी एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्राॅनिक तराजूचा वापर होताना दिसला. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचेही दिसून आले.
विशेष म्हणजे, अनेक दुकानांतील वजनांचे पासिंगच केले नसल्याचे आढळून आले. अनेक दुकानात वर्षानुवर्षांपासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात; मात्र काही ठिकाणी ग्रॅमच्या वजनाऐवजी एक रुपया, पाच रुपयांची नाणी वापरली जात आहे. काही दुकानात तर केवळ लोखंडच तराजूमध्ये ठेवले जाते आणि वस्तू त्यानेच मोजून दिल्या जातात. यात ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून आले.
बॉक्स
भाजी विक्रेत्यांकडूनही लूट
प्रस्तुत प्रतिनिधीने भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारला असता, या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजी विक्रेते भाजीपाला मोजून देतात; मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले. एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसऱ्या भाजी विक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. तेथीलच भाजी विक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून कमी किमतीत टमाटर विकले जात असल्याचे सांगितले.
बॉक्स
वजनांची पासिंग नाही
दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासिंग होणे अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासिंगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.
बॉक्स
दरात मोठी तफावत
तांदूळ, डाळ, गहू, साखर व इतर वस्तूंच्या दराविषयी काही दुकानांत माहिती घेतली असता त्यात मोठी तफावत दिसून आली. प्रत्येक वस्तूची किंमत विविध दुकानांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून आले. याबाबत एका किराणा दुकानदाराला विचारले असता, त्याने वस्तूच्या क्वाॅलिटीमुळे ही तफावत असल्याचे सांगितले; मात्र वजनातही घोळ असण्याची शक्यता यात आहे.