व्यापारी प्रतिष्ठाने चोरट्यांच्या रडारवर
By Admin | Updated: November 4, 2015 00:47 IST2015-11-04T00:47:19+5:302015-11-04T00:47:19+5:30
चंद्रपूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने सध्या चोरट्यांच्या रडारवर असून दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना,...

व्यापारी प्रतिष्ठाने चोरट्यांच्या रडारवर
चंद्रपुरात टोळी सक्रिय : सणोत्सवाच्या काळात आर्थिक फटका
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने सध्या चोरट्यांच्या रडारवर असून दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात चोरट्यांची एक टोळीच सक्रिय झाल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते.
तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तीन वेगवेगळी प्रतिष्ठाने फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटनांनी व्यापारी वर्तुळ हादरून गेले आहे. दिवाळी सणाची लगबग सुरू झाली असून या पर्वावर व्यापाऱ्यांची विक्रीसाठीची खरेदी आटोपली आहे. दिवाळीनिमित्त आर्थिक उलाढालही वाढत आहे. अशातच आता चोरट्यांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. नागपूर मार्गावर सिव्हील लाईन परिसर व गजानन महाराज मंदिर चौकात झालेल्या घटनांतील चोरीची पद्धत ही एकाच स्वरूपाची असून त्यामुळे या तिनही दुकानांमध्ये एकाच टोळीने हात साफ केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र अद्याप या चोरीतील धागेदोरे पोलिसांना गवसले नाहीत.
दरवर्षीच सणोत्सवाच्या काळात चंद्रपुरात चोरटे सक्रिय होतात. यंदाही तिच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या घटनांना आळा घालणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणारे आहे. एकूणच नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)