राष्ट्रनायक अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा
By Admin | Updated: August 4, 2015 00:38 IST2015-08-04T00:38:47+5:302015-08-04T00:38:47+5:30
सहस्त्रकातील महामानव, माजी राष्ट्रपती, वैश्विक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातील शेकडो संस्था..

राष्ट्रनायक अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा
सर्वपक्षीय आदरांजली : भरगच्च उपस्थिती
चंद्रपूर : सहस्त्रकातील महामानव, माजी राष्ट्रपती, वैश्विक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातील शेकडो संस्था आणि संघटना तसेच हजारो नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात शहरातील सर्व स्तरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. कलाम यांनी देशहिताकरिता, समाजाकरिता अमुल्य योगदान दिले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धासुमने अर्पण करण्यात आली. रविवारी सायंकाळी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाला केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, ज्येष्ठ विधीज्ञ रविंद्र भागवत, रिपाई नेते व्ही. डी.मेश्राम, डॉ. अशोक जीवतोडे, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय आर्इंचवार, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, विनोद दत्तात्रय, सतिश भिवगडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय चंदावार, मनोवेधचे विजय बदखल, रमणिकभाई चव्हाण, दामोधर मंत्री, डॉ. सालफळे, डॉ. रितेश दीक्षित, मधुसूदन रुंगठा यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक जणांची उपस्थिती होती. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी डॉ. कलामांच्या लाभलेल्या सानिध्यामुळे जीवन सफल झाल्याचे सांगत ते आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नसल्याचे सांगितले. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. कलामांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्राचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी डॉ. कलामांच्या आठवणींना उजाळा दिला. (शहर प्रतिनिधी)