रेती तस्करांवर तहसील प्रशासनाची मेहरनजर
By Admin | Updated: May 5, 2017 00:58 IST2017-05-05T00:58:12+5:302017-05-05T00:58:12+5:30
तालुक्यातील बहुतांक्ष रेतीघाटांवर पोकलॅन्ड वापर करुन रेती उत्खनन करीत असतानाही तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

रेती तस्करांवर तहसील प्रशासनाची मेहरनजर
पोकलॅन्डचा वापर : तस्करांवर कारवाई करण्याची मागणी
मूल: तालुक्यातील बहुतांक्ष रेतीघाटांवर पोकलॅन्ड वापर करुन रेती उत्खनन करीत असतानाही तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रेती तस्कारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घराचे बांधकाम सुरु आहे. सोबतच शासकीय कामेही सुरु आहेत. सदर कामासाठी रेतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यातील हळदी, चिचाळा, बोरचांदली, विरई, कोसंबी रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. तर काही घाटांचा अजूनही लिलाव झालेला नाही. परंतु यातील काही घाटामधून लाखो रुपयांच्या रेतीचे अवैध उत्खनन करुन हायवा ट्रकद्वारे वाहतूक केली जाते. सदर हायवा ट्रक मूल येथील उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयासमोरुन जात असतानाही त्याकडे महसूल प्रशासन कानाडोळा करीत आहे. सदर अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे. सदर रेती घाटापैकी काही घाटावर नियमबाह्य पोकलॅन्डचा वापर करुन रेती उत्खनन केले जात आहे. सदर जडवाहतूकीमुळे करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले रस्ते पायी चालण्यायोग्य राहिलेले नसून पर्यावरण संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. पोकलॅन्डद्वारे अवैध रेती उत्खननबरोबर नदीतील पण्याचा प्रवाह बदलविल्या जात आहे. रेती घाटावर पोकलॅन्ड लावून रेती उत्खनन करण्याची शासनाकडून परवानगी नसतानाही रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती उपसा केल्या जात आहे. पोकलॅन्डद्वारे अवैध रेती उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)