सभेत गदारोळ, विरोधकांनी प्रोसिंडिंग फाडले

By Admin | Updated: October 8, 2015 00:36 IST2015-10-08T00:36:08+5:302015-10-08T00:36:08+5:30

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बुधवारची सभा पुन्हा वादग्रस्त ठरून विरोधकांच्या बहिष्काराने गाजली.

In the meeting, the protesters threw away the prosecution | सभेत गदारोळ, विरोधकांनी प्रोसिंडिंग फाडले

सभेत गदारोळ, विरोधकांनी प्रोसिंडिंग फाडले

जि.प. स्याथी समितीची सभा गाजली : अध्यक्षांनी वेळ बदलविल्यावर आक्षेप
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बुधवारची सभा पुन्हा वादग्रस्त ठरून विरोधकांच्या बहिष्काराने गाजली. अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने काँग्रेसचे विनोद अहीरकर आणि सतीश वारजुकर यांनी प्रोसिडींग फाडून सभेतून बहिर्गमन केले आणि अध्यक्षांचा निषेध नोंदविला.
दर महिन्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेची वेळ दुपारी एक वाजताची असते. मात्र यावेळी ती बदलवून सकाळी ११ वाजताची करण्यात आली. समितीमध्ये असलेले सदस्य ग्रामीण भागातून येणारे असल्याने एवढ्या लवकर उपस्थित राहू शकत नाही, हे अध्यक्षांना माहीत असतानाही केवळ सभेतील विरोधाचा सूर टाळण्यासाठी जाणीवपूर्वक ही वेळ बदलल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. सभेदरम्यान विचारेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अध्यक्ष संध्या गुरनुले त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांशी बोलण्यात वेळ घालवित आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला. आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला अध्यक्षांना वेळ नसेल आणि उत्तरे देण्यात रूची नसेल तर, सभेला उपस्थित राहण्यात अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित करीत अध्यक्षांचा निषेध नोंदवून अहीरकर आणि वारजुकर या दोघांनीही एकामागोमाग सभेतून बहिर्गमन केले.
सभेला ११ वाजता सुरूवात झाली असता कोरमच पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे अध्यक्षांनी काही वेळ सभा स्थगित करून पुन्हा सभा सुरू केली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले या माऊंट अबुला गेल्या होत्या काय, असा प्रश्न विनोद अहीरकर यांनी उपस्थित करून पदाधिकारी मुख्यालय सोडून राज्याबाहेर जाताना परवानगी घ्यावी लागते काय, अशी विचारणा केली. त्यावर, ३० दिवस गैरहजर असल्यास सुटी घ्यावी लागते, बाहेर जाण्यापूर्वी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला प्रभार द्यावा लागतो, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. या नंतर अहीरकर यांनी जवाहर रोजगार योजनेतील विहिरी पावसाळयापूर्वी बांधून देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. पावसाळा संपला असल्याने आजपर्यंत किती विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले, अशीही त्यांनी विचारणा केली. अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितले. मात्र या प्रश्नाचे उत्तर देण्यास सिंचन विभागाचा कोणताही अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे हा प्रश्न बाजूला ठेवून पुढील विषय चर्चेला घेण्याचे अध्यक्षांनी सचिवांना सूचविले. यावर अहिरकर यांनी सभेला वेळेवर उपस्थित राहण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिली नाही काय, असा प्रश्न केला असता, अध्यक्षांनी वेळ मारून नेली. विरोधकांचे मत ऐकून घेण्याची अध्यक्षांची मानसिकता नसल्याचा आरोप करीत अहीरकर यांनी सभेचे कार्यवृत्त फाडून व अध्यक्षांचा निषेध करून सभात्याग केला.
सतीश वारजुकर यांनीही चिमूर तालुक्यातील लाभार्थ्यांच्या विहीरीचा प्रश्न मागील सहा महिन्यापासून वारंवार उपस्थित करूनही न्याय मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. चिमूर नगर पालिकेच्या हद्दीतील गरजू लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ मिळणार अथवा नाही या विषयवरही अध्यक्षांकडून कसलेही उत्तर येत नसल्याचे सांगून त्यांनी निषेध नोंदविला. माहितीच मिळत नसेल, तर या सभागृहात बसून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनीही सभात्याग केला.
दरम्यान, या गोंधळाच्या आड अध्यक्षांनी समाजकल्याण विभागाच्या योजनांना स्थायी समितीची मंजुरी घेण्याचा ठराव पारित केला. चंदनखेडा येथील पशुवैद्यकीय रूग्णालयाच्या इमारतीलाही या सभेत मंजुरी देण्यात आली. मागील बैठकीच्या कार्यवृत्ताचे वाचन करून ही सभा दोन तासात संपविण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. हा वाद आता जिल्हा परिषदेच्या चार भींतीआड न राहता खुलेआमपणे रंगायला लागल्याने जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आली आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: In the meeting, the protesters threw away the prosecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.