अगरबत्ती प्रकल्पास मुख्य सचिवांची भेट
By Admin | Updated: December 30, 2015 01:40 IST2015-12-30T01:40:34+5:302015-12-30T01:40:34+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन मध्ये असलेल्या आगरझरी येथील अगरबत्ती प्रकल्पाला मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रिय यांनी सोमवारी भेट दिली.

अगरबत्ती प्रकल्पास मुख्य सचिवांची भेट
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन मध्ये असलेल्या आगरझरी येथील अगरबत्ती प्रकल्पाला मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रिय यांनी सोमवारी भेट दिली.
त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, उपसंचालक कळसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व स्थानिक वन अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्या निधीतून व वन विभागाच्या प्रयत्नाने आगरझरी आणि भगवानपूर येथे अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक २५ महिलांना रोजगार मिळत असून १ जानेवारीपासून पळसगाव येथे अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना १५० ते २०० रुपये प्रतिदिन रोजगार प्राप्त होत आहे. सद्या या प्रकल्पात २५ महिला काम करीत आहेत. अगरबत्ती प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल वनविभागातर्फे पुरविण्यात येतो. १ महिला दर दिवशी १० ते १५ किलो अगरबत्ती तयार करते. ही अगरबत्ती प्रती किलो १५ रुपयाने घेण्यात येते. यातून एका महिलेस १५० ते २०० रुपये रोजगार प्राप्त होतो. तयार झालेली अगरबत्ती समितीमार्फत नागपूर येथे बाजार पेठेत विकण्यात येते. या प्रकल्पास भेट दिल्यानंतर मुख्य सचिवांनी अगरबत्ती तयार करणाऱ्या महिलांशी चर्चा केली. वनविभागातर्फे हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविल्या जात असल्याचे सांगत प्रकल्पाच्या कामाचे कौतूक केले. (स्थानिक प्रतिनिधी)