बल्लारपुरात कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:35+5:302021-04-18T04:27:35+5:30
शनिवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील डॉक्टर्सशी झुम मिटींगद्वारे संवाद साधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली. शहरात ...

बल्लारपुरात कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्यावा
शनिवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील डॉक्टर्सशी झुम मिटींगद्वारे संवाद साधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली. शहरात आरटीपीसीआर चाचणी केंद्र उघडून त्या माध्यमातून २४ तासाच्या आत शासनमान्य लॅबच्या माध्यमातून रिपोर्ट मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहोत. लसीकरणात जिल्हा अग्रेसर ठरावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्कात आहोत. शहरात शंभर टक्के लसीकरण करण्याच्या द़ष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. चंद्रपूर शहरात वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्याने बल्लारपूर शहरात कोविड हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता आहे. आदिलाबाद, करीमनगर, आसिफाबाद येथील हॉस्पिटल चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांसाठी उपलब्ध व्हावे अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली. मात्र राज्य सरकारने सामंजस्य करार न केल्याने यात अडचण निर्माण झाल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. कोरोनाचे संकट किती काळात संपेल असे सांगता येणार नाही त्यामुळे करण्यात येणाऱ्या उपाययोजना दीर्घकालीन असाव्या यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी डॉ. सत्यनारायण, डॉ. विजय बोनगीरवार, डॉ. मानवटकर, डॉ. सुनिल कुल्दीवार, डॉ. सतीश बंडावार, अजय दुबे, रमेश समसनवार, डॉ. बानोत आदींनी उपाय सुचवत उपाययोजनांच्या अनुषंगाने सूचना केल्या. बैठकीचे प्रास्ताविक नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले. बैठकीला डॉ. क्षमा बोधे, डॉ. श्याम हिवरकर, डॉ. पुरी, डॉ. जी. सी. राठी, डॉ. तुंबडे, मनीष चंदे, डॉ. प्रिया ढाणे आदी डॉक्टर उपस्थित होते.