जागा निश्चिती आघाडीच्या काळातच
By Admin | Updated: January 31, 2015 01:07 IST2015-01-31T01:07:55+5:302015-01-31T01:07:55+5:30
चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची निश्चिती आघाडी सरकारच्याच काळात झाली होती. काँग्रेसच्या नेतृत्वातील महानगर पालिकेनेच जागेसाठी ठरावही दिला आहे.

जागा निश्चिती आघाडीच्या काळातच
चंद्रपूर : चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची निश्चिती आघाडी सरकारच्याच काळात झाली होती. काँग्रेसच्या नेतृत्वातील महानगर पालिकेनेच जागेसाठी ठरावही दिला आहे. यामुळे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेले आरोप निराधार आहेत, अशा शब्दात आमदार नाना शामकुळे यांनी वित्तमंत्र्यांची पाठराखण केली.
येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. या वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दोन दिवसांपूर्वी वित्तमंत्र्यांवर आरोप केले होते. स्वकीयांची आणि स्वत:ची जमीन वाचविण्यासाठी हे महाविद्यालय बल्लारपूर रोडवरील पागलबाबा नगरात प्रस्तावित केले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आमदार नाना श्यामकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. ते म्हणाले, पुगलियांचे आरोप निराधार असून म्हाडा परिसरातील जागा कुणाच्या मालकीच्या आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे स्वहित जपण्यासाठी पुगलियाच प्रयत्नशिल असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार श्यामकुळे म्हणाले, म्हाडाची जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिग्रहणासाठी घेतली असती तर बरीच वर्षे लागली असती. महाविद्यालय परत जाण्याचा धोका होता. यामुळे भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर वित्तमंत्र्यांनी या विषयाला गती देत पुढाकार घेतला. त्यांच्या निर्णयामुळे जुलै-२०१५ पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते. मात्र पुगलियांच्या विरोधी भूमिकेमुळे विकासात खीळ बसण्याची शक्यता असल्याचाही आरोप त्यांनी केला. पागलबाबा नगरातील जागेवर मनपाने यापूर्वी कोल इंडियाचे आरक्षण टाकले होते. याच मनपाने ते हटवून वैद्यकीय महाविद्यालयासाठी १० हेक्टर जागा दिली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने हीच जागा योग्य असल्याने यात विरोध करण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले. भौगोलिक दृष्ट्या जागा गैरसोईची असल्याने आणि रस्ता नसल्याचे पत्रकारांनी त्यांना निदर्शनास आणून दिले. मात्र अनेक प्रश्नांना बगल दिली. पत्रकार परिषदेला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे, विजय राऊत आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)