४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण

By Admin | Updated: May 21, 2017 00:31 IST2017-05-21T00:31:15+5:302017-05-21T00:31:15+5:30

येथून ३० किलोमीटर अंतरावर लाखो रुपये खर्च करून मौलझरी तलावाचे बांधकाम करण्यात आले.

Mauljhari lake is still incomplete after 45 years | ४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण

४५ वर्षांनंतरही मौलझरी तलाव अपूर्ण

५५० शेतकरी वंचित : पावसाळ्यानंतर सिंचनासाठी मिळणार पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथून ३० किलोमीटर अंतरावर लाखो रुपये खर्च करून मौलझरी तलावाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, ४५ वर्षे झाल्यानंतर ते काम अद्याप अपूर्ण आहे. तेव्हापासून ५५० शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. आता चंद्रपूर पाटबंधारे विभागाने पुन्हा हे काम हाती घेतले असून पावसाळ्यानंतर त्यातून तीन गावांमधील ५५० शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
१९७२ मध्ये मौलझरी लघु पाटबंधारे तलावाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. ते काम १९८३मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु या तलावाच्या बंधाऱ्यातून पाझर होत असल्याने पाणी वाहून जाते. तलावाच्या धरणपाळी खालून पाण्याची गळती होते. या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या गावातील शेतकऱ्यांना वारंवार केली होती. सिंचनाची दुसरी कोणतीही सोय नसल्याने जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे तलाव दुरूस्तीसाठी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तलावातून सिंचनाची पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नागपूर येथील भूगर्भ वैज्ञानिकांनी तलावाच्या धरणाच्या पायव्यामध्ये कर्टन गाऊंटिंगची उपाययोजना करण्यात आली नसल्याने धरणपाळी खालून होणारी पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट केले होते. ती उपाययोजना करण्यात आल्यास पाणीसाठा तयार होणे शक्य असल्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणले होते. त्यावेळी जलसंपदा सचिवांनी कर्टन गाऊंटिंग करण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार, या तलावाची गळती थांबविण्याकरिता २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाने १ कोटी ५७ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. त्यानंतर मार्च महिन्यापासून कर्टन गाऊंटिंगचे काम कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी सुरू केले आहे. तलाव गळती दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून आगामी पावसाळ्याचे पाणी तलावात जमा होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना सिंचन करता येणार आहे.

ताडोबातील वन्य प्राण्यांनाही मिळणार पाणी
मौलझरी तलावाची दुरूस्ती झाल्यावर पाणी गळती थांबणार आहे. त्यानंतर ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरूज्जीवित होणार आहे. नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या गावांचा परिसर धान पिकांचे आहे. तलावातून सिंचनाचे पाणी मिळाल्यावर या परिसरात उत्पन्नात वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनाला महसूल मिळणार आहे. हा तलाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे वाघ, अस्वल, हरीण, काळवीट आदी विविध वन्यप्राणी दृष्टीस पडत असतात. त्यांनाही वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होऊन नागरी परिसरात पाण्यासाठी धाव घ्यावी लागणार नाही.

Web Title: Mauljhari lake is still incomplete after 45 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.