गणित बिघडले
By Admin | Updated: September 25, 2014 23:20 IST2014-09-25T23:20:12+5:302014-09-25T23:20:12+5:30
मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने

गणित बिघडले
युती तुटली : आघाडीही सुटली
चंद्रपूर : मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील राजकारणही प्रभावित होणार आहे.
जिल्ह्यात सहा जागांपैकी प्रत्येकी तीन ठिकाणी काँग्रेस व भाजपाचे आमदार आहेत. आजवरच्या भाजपा-सेना युतीमध्ये वरोरा आणि राजुरा या दोन ठिकाणच्या जागा शिवसेनेच्या कोट्यात होत्या. त्यामुळे अन्य चार ठिकाणी तोलामोलाचे उमेदवार शिवसेनेला शोधावे लागणार आहेत. भाजपाने वरोरातून ओम मांडवकर यांचे नाव आधीपासूनच चालविले होते. तर राजुरामध्ये खुशाल बोंडे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजवरच्या आघाडीत सही जागा काँँग्रेसकडेच होत्या. या सर्व ठिकाणी काँग्रेस उमेदवारांची नावे जवळपास ठरली आहेत. गुरूवारी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत राजुरातून सुभाष धोटे, चिमूरमधून अविनाश वारजूकर आणि ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार ही नावे जाहीर झाली आहेत. उर्वारित तीन ठिकाणचे उमेदवारही जवळपास ठरल्यासारखे असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून ब्रह्मपुरीतून संदीप गड्डमवार तर, वरोरातून जयंत टेमुर्डे यांना उमेदवारी जाहीर झाल्यासारखी आहे. राजुरातून सुदर्शन निमकर यांचे नाव पक्षाकडे जवळपास पक्के होते. मात्र ऐन वेळी ते शिवसेनेत गेल्याने तिथे नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. बल्लारपूर, चिमूर आणि चंद्रपुरातही उमेदवारांचे नाव पक्के करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कुणी सावरले, कुणी हादरले !
बदललेल्या राजकीय स्थितीमुळे जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड फेरबदल दिसत आहेत. आघाडी- युती तुटल्याने कुणी सावरले आहेत, तर कुणी हादरले आहेत. चिमूरचे अविनाश वारजुकर यांचा संयम कामी आला. स्वतंत्र आघाडी करण्याच्या विचारात असलेल्या वारजुकरांना चिमुरातूनच हक्काची जागा मिळाली. विजय वडेट्टीवार यांचे अखेर ब्रह्मपुरीत स्थानांतरण झाले. राजुराचे सुदर्शन निमकर यांची स्थिती मात्र अवघड झाली आहे. राजुरातून राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनाच पक्के होते. मात्र, आघाडी भंग होणार नाही व राकॉचे तिकीट मिळणार नाही, असा समज करून ते शिवसेनेत प्रवेशले. नेमकी त्याच क्षणी आघाडी भंगली. अॅड. हर्षल चिपळूणकर यांना बल्लारपुरातून तिकीट हवे होते. पूर्वी राष्ट्रवादीच्या, नंतर प्रहार संघटनेच्या आणि त्यानंतर काँंगे्रसच्या राजकीय व्यासपिठावर दिसणाऱ्या अॅड. चिपळूणकर ऐन वेळी बल्लारपूरचे तिकीट घेऊन मनसेच्या मंचावर प्रगटल्या आहेत. मात्र काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून तिकीटावर लढण्याचे त्यांचे स्वप्न बदललेल्या राजकारणाने भंगले आहे. भाजपाचे चंद्रपुरातील नेते किशोर जोरगेवार यांना चंद्रपुरातून तिकीट हवे आहे. येथे भाजपाचे विद्यमान आमदार नाना श्यामकुळे दावेदार आहेत. मात्र अद्याप कसलीही घोषणा नाही. त्यामुळे जोरगेवारांना अजूनही अपेक्षा आहे. वरोरा तालुक्यातील लाल पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे ओम मांडवकर वर्षभरापूर्वी भाजपात आले. युती होणार की तुटणार, अशा द्विधा मनस्थितीत त्यांची संभाव्य उमेदवारीही डावावर लागलेली असतानाच युती तुटली. सहाजिकच त्यांचा भाजपाच्या तिकीटावरून लढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.