माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ
By Admin | Updated: March 24, 2015 00:34 IST2015-03-24T00:34:20+5:302015-03-24T00:34:20+5:30
चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे

माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ
चंद्रपूर : चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून भाविकांना यात्रेदरम्यान अडचणी येऊ नये यासाठी विविध संघटनांनीही व्यवस्थेसाठी सरसावल्या आहेत.
२५ मार्च बुधवारला सकाळी ११ वाजता चंद्रपूरचे गोंडराजचे विरेंद्रशहा राजे चंद्रशहा आत्राम यांचा राजवाडा समाधी वार्ड, चंद्रपूर येथून गोंडी नृत्याच्या गजरात वाजत गाजत गोंडराजांची मिरवणूक निघेल व गांधी चौक मार्गे अंचलेश्वर मंदिरात जाऊन शंभु शेक दर्शन घेऊन मंदिरा पर्यंत मिरवणूक जाईल. त्यानंतर आराध्य देवता माता महाकालीची गोंड संस्कृतीप्रमाणे गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते पूजाविधी करण्याचा कार्यक्रम गोंडराजे समाज सुधारक समितीतर्फे आयोजित केला आहे. श्रीरावण इनवाते यांच्या हस्ते गोंडी धर्म रीतिरिवाजाप्रमाणे पूजाअर्चना होणार आहे. या कार्यक्रमाला गोंडी बांधवांनी उपस्थित राहून देवी महाकालीच्या यात्रा प्रारंभीच्या पूजेत सहभागी होण्याचे आवाहन गोंडराजे समाज सुधारक ट्रस्ट, राणी हिराई प्रतिष्ठान, मूळ भारतीय आदिवासी कृती संघटना चांदागड यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनानेही यात्रेसाठी चोख व्यवस्था केली आहे. माता महाकाली यात्रा एक महिना चालत असते. यात्रेसाठी राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दर्शनासाठी येत असतात. (स्थानिक प्रतिनिधी)