माता महाकाली यात्रेला प्रारंभ

By Admin | Updated: March 26, 2015 00:51 IST2015-03-26T00:51:39+5:302015-03-26T00:51:39+5:30

चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

Mata Mahakali Yatra started | माता महाकाली यात्रेला प्रारंभ

माता महाकाली यात्रेला प्रारंभ

चंद्रपूर : चंद्रपूरकरांची आराध्यदैवत असलेल्या माता महाकाली यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून १७ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूरचे गोंडराजचे विरेंद्रशहा राजे चंद्रशहा आत्राम यांचा राजवाडा समाधी वार्ड, चंद्रपूर येथून गोंडी नृत्याच्या गजरात वाजत गाजत गोंडराजांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गांधी चौक मार्गे अंचलेश्वर मंदिरात पोहचली. त्यानंतर शंभु शेक दर्शन घेऊन महाकाली मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आराध्य देवता माता महाकालीची गोंड संस्कृतीप्रमाणे गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते पुजाविधी कार्यक्रम गोंडराजे समाज सुधारक समितीतर्फे करण्यात आले.
श्रीरावण इनवाते यांच्या हस्ते गोंडी धर्म रितीरिवाजाप्रमाणे ही पूजाअर्चना झाली. गोंडराजे समाज सुधारक ट्रस्ट, राणी हिराई प्रतिष्ठाण, मुळ भारतीय आदिवासी कृती संघटना चांदागड यांनी या मिरवणूकीचे आयोजन केले होते.
यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसरात चोख व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी येऊ नये यासाठी, रांगेत बांबू बांधून त्यामधूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे. ही यात्रा एक महिना चालणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संघटनांनीही सरसावल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

शहर वाहतुकीत बदल
यात्रेदरम्यान शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतुकीत बदल केला आहे. जिल्हा परिषद मार्गावरून जटपुरा गेट मार्गे जाणारी तसेच रामाळा तलाव मार्गे जटपुरा गेटकडे येणारी चारचाकी वाहने सरळ कस्तुरबा मार्गे मौलाना आझाद चौकातून, आझाद बगीचाच्या बाजुने लिंक रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपुरा गेटमधून बाहेर पडतील. तसेच बांगला नगर, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नानागरिकांनी शहरात जाणेस किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वॉर्ड मार्ग या रस्त्याचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बांगला चौक हा मार्ग सायकल व्यतिरीक्त सर्व वाहनांकरिता बंद राहणार असल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी आदेश काढले आहे.

Web Title: Mata Mahakali Yatra started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.