लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग झारखंड येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात झाली. या अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत १० तालुक्यांतील ११५ तर चिमूर प्रकल्पांतर्गत ५ तालुक्यांतील ५५ अशा १६७ गावांचा समावेश असून, यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष उन्नत ग्राम योजनेत आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी १७ शासकीय मंत्रालय विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने २५ उपक्रमांचा समावेश आहे. सक्षम पायाभूत सुविधा पुरविणे, पात्र कुटुंबांना पक्के घर, नळाचे पाणी, वीजपुरवठा उपलब्धतेसह पक्के घर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण केले जाईल.
या अंतर्गत आदिवासी गावे बारमाही जोडरस्ते व कनेक्टिव्हिटीने जोडली जाईल. आरोग्य, पोषण व शिक्षण, समग्र शिक्षा व पोषण प्रदान, कौशल्य विकास उद्योजकता प्रोत्साहन व वर्धित उपजीविका योजनांचा लाभ देण्यात येईल.
आदिवासी मुलामुलींना दहावी व बारावीनंतर दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळेल. विपणन साहाय्य देणे, वनहक्कपट्टा धारकांसाठी टुरिस्ट होम स्टे, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालनासाठी साहाय्य देण्यात येईल. जिल्हा व तालुका स्तरावर शाळांत आदिवासी वसतिगृहे उभारण्यात येईल. फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे लसीकरण, आदिवासी गावे पीएम गतीशक्ती पोर्टलवर संलग्न केले जातील. अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.
अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मास्टर प्लानमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १६७ गावांचा कायापालट होऊन नागरिकांचीही उन्नती होण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रशासनही कामाला लागले आहेत.