दूषित पाण्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: December 26, 2016 01:19 IST2016-12-26T01:19:50+5:302016-12-26T01:19:50+5:30
नजीकच्या वेकोलिच्या जुन्या खुल्या कोळसा खाणीत मोठया प्रमाणात तलावासारखे पाणी आहे.

दूषित पाण्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू
घुग्घुस : नजीकच्या वेकोलिच्या जुन्या खुल्या कोळसा खाणीत मोठया प्रमाणात तलावासारखे पाणी आहे. त्या ठिकाणी नकोडा क्षेत्रातील सुमारे ३० जण मच्छीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. आज रविवारी या तलावातील मासोळ्या मृत अवस्थेत आढळून आल्याने मच्छीमारामध्ये खळबळ उडाली.
या घटनेमुळे सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील अनेक वर्षापूर्वी वेकोलिच्या नकोडा खुल्या कोळसा खाणीतून कोळसा उत्खनन केल्यानंतर खाण बंद करण्यात आली. त्या ठिकाणी चारही बाजूंनी मातीचा उंच ढिगारे असल्याने खोलवर पाणी साचलेले आहे. त्यामुळे त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून सुमारे ३० मच्छीमार एकत्र येऊन मच्छीपालन व्यवसाय करीत आहेत. त्या तलावात लहान मासांपासून तर ८ ते १० किलो वजनाचे मासे असल्याचे मच्छीमाराकडून कळते.
आज त्या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने मच्छीमार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. एका कारखान्यातील रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हा प्रकार घडला, अशा आरोप नकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच तनुश्री बांदूरकर यांनी केला आहे. (वार्ताहर)