शिवभोजनऐवजी लाभार्थ्यांना मसाला भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:44+5:302021-03-16T04:29:44+5:30

चंद्रपूर : गरिबांना पोटभर अन्न मिळावे, कुणीही उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. मात्र अधिक ...

Masala rice to the beneficiaries instead of Shivbhojan | शिवभोजनऐवजी लाभार्थ्यांना मसाला भात

शिवभोजनऐवजी लाभार्थ्यांना मसाला भात

चंद्रपूर : गरिबांना पोटभर अन्न मिळावे, कुणीही उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. मात्र अधिक लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी काही हाॅटेल संचालक लाभार्थ्यांना शिवभोजन थाळी देण्याऐवजी केवळ मसाला भात देत असल्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. यासंदर्भात अन्न पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी धाड टाकून संबधित प्रकार उघडकीस आणला आहे. यासंदर्भात पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी या संचालकांवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील गरीब तसेच गरजू नागरिकांना अत्यल्प दरात शिजलेले अन्न मिळावे यासाठी राज्य सरकारने २६ जानेवारी २०१९ मध्ये राज्यात शिवभोजन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाॅकडाऊनच्या काळामध्ये अनेक लाभार्थ्यांना फायदाही झाला असून, योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले. शिवभोजनसाठी काही हाॅटेल तसेच बचत गटांची निवड करण्यात आली. याअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ दहा रुपयामध्ये शिवभोजन थाळी मिळते. यासाठी राज्य सरकारला तब्बल ४५ रुपयाचा भार एका थाळीमागे उचलावा लागत आहे. यामध्ये एक वाटी भाजी, एक वाटी वरण, दोन पोळ्या, एक वाटी भात वितरित करावा लागतो.

चंद्रपूर शहरात सहा शिवभोजन केंद्र आहे. यातील विशाला महिला बचत गट, शिवभोजन केंद्र गंजवाॅर्ड व सुकून शिवभोजन केंद्र सरकारी दवाखान्याजवळ या दोन केंद्रावर शिवभोजनाऐवजी लाभार्थ्यांना मसाला भात वितरित केला जात असल्याचा प्रकार अन्न पुरवठा निरीक्षक भारत तुंबडे यांनी या केंद्रावर धाड टाकली तेव्हा लक्षात आला. या गंभीर प्रकरणी त्यांनी अहवाल तयार करून कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. अन्न पुरवठा निरीक्षकांच्या धाडीमुळे अन्न शिवभोजन केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे.

कोट

शहरात सहा शिवभोजन केंद्र मंजूर आहेत. यातील काही केंद्रावर धाड टाकून तपासणी केली असता दोन ठिकाणी शिवभोजनऐवजी मसाला भात वितरित केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.

- भारत तुंबडे

पुरवठा निरीक्षक अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Masala rice to the beneficiaries instead of Shivbhojan