एटीएममधून रक्कम पळवणारे जेरबंद
By Admin | Updated: June 11, 2015 01:27 IST2015-06-11T01:27:32+5:302015-06-11T01:27:32+5:30
एटीएम कार्ड चोरुन आयुध निर्माणी गेट जवळील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये चोरणारा वेकोलि कर्मचारी ....

एटीएममधून रक्कम पळवणारे जेरबंद
भद्रावती : एटीएम कार्ड चोरुन आयुध निर्माणी गेट जवळील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये चोरणारा वेकोलि कर्मचारी व त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. जितेंद्र ईश्वर आस्वले (३०) व संजय शंकर रेशवेनी (२०) असे आरोपींची नावे आहेत.
१९ एप्रिलला आयुध निर्माणी गेट जवळील एटीएमवर रवींद्र रमेश कातकर रा. गवराळा हा आपल्या आईवडीलांना तीन हजार रुपये देण्याकरिता रक्कम काढण्यासाठी आला. रक्कम काढल्यानंतर मोजत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याचे एटीएम कार्ड चोरुन नेले. त्या कार्डवर गुप्त कोड नंबर लिहून असल्याने त्या चोरट्याने विविध दोन बँकांच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये काढले. याबाबत रमेश यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या दोन्ही बँकातील सीसीटीव्ही फूटेज बघितले असता आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर आला. त्या आधारे येथील वेकोलि कर्मचारी जितेंद्र आस्वले व त्याचा सहकारी संजय रेशवेनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक क्षिरसागर, दिनेश सूर्यवंशी यांनी केली. (शहर प्रतिनिधी)