‘श्रीनिवासन’च्या दुर्दैवी मृत्यूने अनेक प्रश्न

By Admin | Updated: May 1, 2017 00:44 IST2017-05-01T00:44:14+5:302017-05-01T00:44:14+5:30

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला वैभव प्राप्त करून देण्यात ‘जय’चे जेवढे योगदान तेवढेच योगदान ‘श्रीनिवासन’चे सुद्धा आहे.

Many questions about the unfortunate death of 'Srinivasan' | ‘श्रीनिवासन’च्या दुर्दैवी मृत्यूने अनेक प्रश्न

‘श्रीनिवासन’च्या दुर्दैवी मृत्यूने अनेक प्रश्न

उमेरड-कऱ्हांडला अभयारण्य : मानव-वन्यप्राणी संघर्ष ऐरणीवर
घनश्याम नवघडे - नागभीड
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला वैभव प्राप्त करून देण्यात ‘जय’चे जेवढे योगदान तेवढेच योगदान ‘श्रीनिवासन’चे सुद्धा आहे. मात्र याच श्रीनिवासनच्या मृत्यूस एक शेतकरी कारण ठरला असून यावरून श्रीनिवासनच्या मृत्यूबद्दल हळहळ तर व्यक्त होत आहेच. पण त्याचबरोबर शेतीच्या संरक्षणाचा मुद्दाही अधोरेखित करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. वाघ जंगल सोडून मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. वाघावर हे दिवस का आलेत, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. वाघाने किंवा तत्सम प्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेवू नये, यासाठी शासनस्तरावर काही उपाय योजना करता येतील का, अशाही प्रतिक्रिया श्रीनिवासनच्या मृत्यूच्या निमित्ताने व्यक्त होत आहेत. वराहपालन व ससेपालन हा एक उपाय सूचविला जात आहे.
ज्या शेतकऱ्याच्या शेतात श्रीनिवासनचा विद्युत प्रवाहाने दुर्दैवी अंत झाला, तो शेतकरी काही उच्च विद्याविभूषित नाही. त्याला कायद्याचे ज्ञान असावे, असेही वाटत नाही. शेतात राबणे आणि आपला प्रपंच चालविणे, हेच त्याचे जग. जीवापाड जपलेलं पीक रानटी डुकरं नष्ट करतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्याने शेतात विद्युत प्रवाह सोडला. पण झाले उलटे. प्रख्यात असा श्रीनिवासन नावाचा वाघच यात अडकला.
यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी आता वन विभागानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या तीन- चार वर्षांपासून वन विभाग जंगल परिसरातील गावांना एल.पी.जी. गॅसचे वितरण करीत आहे. लोकांनी सरपणासाठी जंगलात जावू नये, जंगल तोड करू नये, शिवाय मानव आणि जंगली पशू यांच्यातील संघर्ष टळावा हा यामागचा उद्देश. अगदी याच धरतीवर जंगल व्याप्त शेतीचे सर्वेक्षण करून अशा शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे व कमी विद्युत प्रवाहाचे कुंपण वितरित करावे. या सोबतच अशा शेतकऱ्यांची वर्षातून एकादी कार्यशाळासुद्धा आयोजित करावी. यात प्रबोधन करावे, अशाही प्रतिक्रिया यासंदर्भात ऐकायला मिळत आहेत.
वाघच काय अन्य पशुपक्षीही राष्ट्रीय संपत्ती आहे. या राष्ट्रीय संपत्ती संरक्षण आणि जतन होणे गरजेचे आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर एक दिवस असा येईल की, हे सर्व पशू पक्षी चित्रातच पाहायला मिळतील. एवढेच काय आज काही प्रमाणात का होईना वाघ आहे म्हणून जंगल तरी शिल्लक आहेत. यासाठीही वाघाचे जतन होणे महत्त्वाचे आहे. जय तर एक वर्षापासून बेपत्ता आहे. आज श्रीनिवासनचा अशाप्रकारे दुर्दैवी शेवट झाला. उद्या अन्य वाघांवरही अशी पाळी येवू शकते आणि म्हणूनच काळाची पावले ओळखून वन विभागाने वाघांच्या व जंगली श्वापदांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

Web Title: Many questions about the unfortunate death of 'Srinivasan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.