महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 02:47 PM2022-03-03T14:47:03+5:302022-03-03T15:04:20+5:30

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे.

many public transport vehicle still not installed panic button | महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण नावालाच !

महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण नावालाच !

googlenewsNext
ठळक मुद्दे अनेक महिलांना पॅनिक बटणाबाबत माहितीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : महिलांना सुखरूप प्रवास करता यावा, यासाठी खासगी प्रवासात पॅनिक बटण बसविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी वाहनांत हे बटणच दिसून येत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे महिलांना स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावी लागत असल्याचे चित्र आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. चंद्रपूर येथून नागपूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, चिमूर, गडचिरोली, वरोरा यासह विविध ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स धावतात. परंतु, बहुतांश खासगी वाहनांमध्ये असे पॅनिक बटण दिसून येत नाही. कुठे दिसलेच तर ते बंद असते. विशेष म्हणजे या पॅनिक बटणाबाबत महिलांना माहितीच नसल्याचे वास्तव आहे.

पॅनिक बटण म्हणजे काय?

प्रवासी महिलेशी गैरवर्तणूक झाल्यास किंवा असुरक्षितता वाटल्यास ती पॅनिक बटण दाबू शकते. ही माहिती कंट्रोल रूमला जाते. व्हीटीएसद्वारे लोकेशन कळते.

हे कसे काम करते?

पॅनिक बटण दाबल्यानंतर व्हीटीएस किंवा जीपीएस प्रणालीद्वारे याची माहिती ११२ हेल्पलाईनला जाते. यावरून पोलिसांचे पथक लगेच त्या ठिकाणी पोहोचून त्या महिलेला मदत करीत असते.

प्रवासात असुरक्षित वाटल्यास काय कराल?

प्रवासात असुरक्षित वाटल्यास ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांनाही संपर्क करून माहिती देता येते. आपल्या शेजारील प्रवाशांनाही माहिती देता येते.

सर्वप्रथम वाहनातील पॅनिक बटण दाबून चालक, वाहकाला माहिती द्यावी. पोलीस यंत्रणा येईपर्यंत वाहक चालक व शेजारील प्रवाशाला माहिती द्यावी.

'लोकमत'ला काय आढळले

बटण नादुरुस्त

चंद्रपूर गडचिरोली मार्गावर अनेक खासगी ट्रॅव्हल्स धावतात. यातील एका ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता, हे बटण नादुरुस्त होते. वाहकाला विचारणा केली असता, त्याने याबद्दल माहितीच नसल्याचे सांगितले.

माहितीच नाही

एका ट्रॅव्हल्समध्ये पॅनिक बटण दिसून आले नाही. वाहकाला पॅनिक बटणाबाबत विचारले असता, कसले पॅनिट बटण? याबाबत आम्हाला काही माहितीच नसल्याचे त्याने सांगितले. महिला प्रवासीही याबाबत अनभिज्ञ आहेत.

सन २०१८ मध्ये उत्पादित वाहनाला पूर्वीच पॅनिक बटण बसवलेले असते, तर त्यापूर्वीच्या वाहनाला बटण अनिवार्य केले आहे. अडचणीतील महिलांना बटण दाबल्यास महिला कंट्रोल रूमला माहिती पोहोचत असते. ज्या वाहनावर असे बटण नसते, त्याच्यावर कारवाई करण्यात येते.

- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: many public transport vehicle still not installed panic button

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.