‘त्या’ मांत्रिकाला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: May 18, 2014 23:28 IST2014-05-18T23:28:30+5:302014-05-18T23:28:30+5:30
प्रकृती बिघडलेल्या व्यक्तीस गावातील एका व्यक्तीने जादू केली असे मांत्रिकाने सांगितल्यानंतर दोन कुटुंबात वाद रंगला. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध नव्याने अस्तित्वात आलेल्या

‘त्या’ मांत्रिकाला न्यायालयीन कोठडी
वरोरा : प्रकृती बिघडलेल्या व्यक्तीस गावातील एका व्यक्तीने जादू केली असे मांत्रिकाने सांगितल्यानंतर दोन कुटुंबात वाद रंगला. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध नव्याने अस्तित्वात आलेल्या जादुटोणाविरोधी कायद्याअन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. त्यानंतर मांत्रिकाला वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शंकर दडमल ऊर्फ बारेकर असे मांत्रिकाचे नाव आहे. मांत्रिक हा शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या आष्टा जंगल परिसरातील भानुसखिंड येथील रहिवासी आहे. वरोरा तालुक्यातील बोपापूर गावात तीन व्यक्तींची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना गावातील व्यक्तीने जादू केल्याचा दावा मांत्रिक शंकर याने केला. त्यामुळे दोन कुटुंबात वाद सुरू झाला. या वादानंतर वरोरा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी दोघा कुटुंबाविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही केली. त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांनी सदर प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर यासर्व घटनांमध्ये शंकर दडमल ऊर्फ बारेकर जबाबदार असल्याने त्याच्यावर जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर सदर मांत्रिकावर जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सदर प्रकरण वरोरा पोलिसांनी शेगाव पोलिसांकडे सुपुर्द केले. शेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात मांत्रिक शंकर दडमल ऊर्फ बारेकार यास अटक केली. मांत्रिकाला वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जादुटोणाविरोधी कायदा नव्यानेच लागू झाला आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची पहिलीच घटना आहे.