माणिकगड पहाडावर नांदू लागली शांतता !
By Admin | Updated: April 19, 2015 01:15 IST2015-04-19T01:15:30+5:302015-04-19T01:15:30+5:30
सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह,

माणिकगड पहाडावर नांदू लागली शांतता !
जिवती : सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह, परिसरात वाढत जाणारी गुन्हेगारी, चोरी, बलात्कार, खून आदी प्रकारामुळे जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले होते. दारूबंदीनंतर १५ दिवसांतच जीवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर शांतता नांदू लागल्याचे चित्र दिसत असून परिसरातील महिला यामुळे समाधानाचे जीवन जगत आहे.
गावात कुठलाही समारंभ असला की, हौसेने दारू पिऊन बँड, डिजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईला आवरणे कठिण होऊन बसले होते. नाचण्याच्या कार्यक्रमामुळे विवाहाला विलंब होतच होता.सोबत भांडणेही होत असत. दारूबंदीनंतर हा प्रकार कमी झाला आहे. दारूमुळे परिसरात होणाऱ्या विकास कामासाठी मजुरही मिळत नव्हते. गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकजण मद्यप्राशन करून भांडण-तंटे करत असत. पहाडावर सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवश्यावर शेती करावी लागते. त्यात वर्षानुवर्षे निसर्गाचा फटका बसत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. त्यातून त्यांची व्यसनाधिनताही वाढत होती. त्यातून अशाप्रकारे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेक महिलांचे सौभाग्य हरविले. काहींनी तरुण पणातच आपला जीव गमावला. दारूमुळे महत्त्वाची कामे तर सोडाच पण संसार व पोटच्या गोळ्याकडेही लक्ष देण्याचे भान त्यांना राहत नसे. चांगले संस्काराअभावी भावी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीची दखल घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात दारूबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी मदत होत आहे. दारूमुळे कंटाळलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. दारूमुळे उद्ध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)