मंगेश पाडगावकरांनी बरसविल्या होत्या काव्यधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:54 IST2015-12-31T00:54:25+5:302015-12-31T00:54:25+5:30
मराठी साहित्य क्षेत्रात मोठे नाव असलेले कवी मंगेश पाडगावकर हे चंद्रपूरला १६ जून २००८ ला आले होते.

मंगेश पाडगावकरांनी बरसविल्या होत्या काव्यधारा
आठवणींना उजाळा : चंद्रपुरात झाला होता कार्यक्रम
बल्लारपूर : मराठी साहित्य क्षेत्रात मोठे नाव असलेले कवी मंगेश पाडगावकर हे चंद्रपूरला १६ जून २००८ ला आले होते. त्यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम प्रियदर्शनी सभागृहात स्नेहांकितच्या वतीने झाला होता. त्यांच्या बहारदार व चौफेर रंगाच्या कवितांनी श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला होता.
पाडगावकर हे कुणा एका खास विषयाचे कवी म्हणून राहिले नाहीत. त्यांनी काव्यातील सर्वच प्रकार हाताळले. राजकारण, समाजकारण, निसर्ग, बाल काव्य, व्यंग, विनोद या सर्वच काव्यप्रकारात त्यांचा संचार होता. त्याचा प्रत्यय चंद्रपुरातील त्यांच्या काव्य गायनातून आला.
समाजातील चांगल्या-वाईट प्रवृत्तीवर त्यांनी बेधडकपणे काव्य रचले. आणि तेवढ्याच ताकदीने ते रसिकांपुढे मांडले. प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. रसिकांना, त्यांच्या काव्य गायन कार्यक्रमातून त्यांची प्रसन्नता ठळकपणे अनुभवायला मिळायची. चंद्रपुरात भाऊ मराठे यांनी घेतलेल्या मुलाखतीत मंगेश पाडगावकर हे नवीन कविंना मार्गदर्शन करीत म्हणाले होते की ग्रामीण कवींचा जगण्याचा अनुभव वेगळा व शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या कवीचा अनुभव वेगळा असला तरी त्या-त्या ठिकाणची अनुभवाची समृद्धी वाढवावी आणि नवोदित कवींनी आशयघन कविता लिहावी. त्या लिहिल्या जात आहेत व मनाला भिडणाऱ्याही आहेत. त्यांच्या विविध जाणिवा कविंतामध्ये आहेत.
बल्लारपूर येथील कवी प्रा. विजय सोरते यांनी मंगेश पाडगावकर यांच्या काव्यावर पीएचडी मिळविली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘कविवर्य मंगेश पाडगावकर आणि कविवर्य सुरेश भट यांच्या काव्यवाड्:मयाचा तैलीक अभ्यास’ हा होता. या निमित्ताने प्रा. सोरते यांचा पाडगावकर यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखतीचा प्रसंग आला आहे. त्यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.
या कविवर्याला भावपूर्ण श्रद्धांजली! (तालुका प्रतिनिधी)