चिमुरात मनसेची गांधीगिरी
By Admin | Updated: August 23, 2016 01:16 IST2016-08-23T01:16:21+5:302016-08-23T01:16:21+5:30
चिमूर तालुक्यातील जनसामान्यांच्या मागण्यासह चैती तुकूम येथील अवैध उत्खनन व चिमूर क्रांती

चिमुरात मनसेची गांधीगिरी
चिमूर : चिमूर तालुक्यातील जनसामान्यांच्या मागण्यासह चैती तुकूम येथील अवैध उत्खनन व चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिमूरच्या वतीने येथील तहसील कार्यालयापुढे गांधीगिरी करत सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिल्या जातो. हा त्रास दूर करून शासनाचा महसूल बुडवणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, चैती तुकूम येथे अवैध उत्खनन करून शासकीय महसूल बुडविल्यामुळे रॉयट ब्लु रिसोर्टच्या संचालकावर शासकीय कारवाई न करता त्याची पाठराखण करणारे नायब तहसीलदार विनायक मगर यांच्यावर निलंबणाची कारवाई करून विभागीय चौकशी करावी, तहसील कार्यालयाचे काम पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, चिमूर वडाळा येथील लेआऊटधारकांनी नियमांचा भंग करून ओपन स्पेसची बेकायदा विक्री केली. या लेआऊटधारकावर कारवाई करण्यात यावी, तत्कालिन तहसीलदार निलेश काळे यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेले बोगस अंत्योदयश बीपीएल कार्ड रद्द करून चौकशी करावी, शेती व जमिनी बाबतचे फेरफार प्रकरण तातडीने पूर्ण करावे, चिमूर नगर परिषदेत विविध पदावर करण्यात आलेल्या बोगस भरतीची विभागीय चौकशी करण्यात यावी या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती संदर्भात शासनस्तरावर शिफारस करण्यात यावी, या मागण्यांसाठी मनसेने गांधीगिरी करीत तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता मनसेचे चिमूर शहरध्यक्ष महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनासाठी चिमूर विधानसभेचे अध्यक्ष अरविंद सांदेकर, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, तालुकाध्यक्ष प्रशांत कोल्हे, नितीन लोणारे, उपाध्यक्ष संजय वाकडे, तुषार हजारे यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरू असून मागण्या न सोडविल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा अरविंद सांदेकर व दिलीप रामेडवार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)