चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST2017-07-20T00:38:09+5:302017-07-20T00:38:09+5:30

अज्ञान, आरोग्य आणि गरिबी यातून कुपोषण जन्माला येते. त्यामुळे या तिनही घटकांवर वरोरा तालुक्यामध्ये माता व बाल कुपोषण निर्मूलन समितीचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे.

The malnutrition in Chandrapur district will be brought to zero | चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणणार

चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणणार

सुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन समितीचा गौरव
चंद्रपूर : अज्ञान, आरोग्य आणि गरिबी यातून कुपोषण जन्माला येते. त्यामुळे या तिनही घटकांवर वरोरा तालुक्यामध्ये माता व बाल कुपोषण निर्मूलन समितीचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही संपूर्ण जिल्ह्याला प्रेरणा देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र ही लढाई पुढेही जोमाने लढायची असून जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी आपला लढा आणखी तीव्र करा, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येन्सा, टेभुर्डा, भटाळा, चिनोरा व कोंढाळा या गावांमधील माता व बाल कुपोषण समितीने वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात या भागामध्ये उत्कृष्ठ कार्य केले आहे. गावा गावांमध्ये जावून त्यांनी महिलांमध्ये कुपोषणाच्या संदर्भात प्रत्यक्ष भेटी देवून शुन्य दिवसांपासूनच्या कुपोषणावर कशी मात करायची, याबाबत प्रबोधन केले आहे. बुधवारी अशा गटांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, बारा बलुतेदारांच्या समाज रचनेतून आणि पारंपरिक सण उत्सवाच्या परंपरेतून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने कुपोषणाला सुरुवात झाली. कुपोषणाचा प्रश्न हाताळताना अज्ञान दूर करणे, उत्तम आरोग्य राखणे आणि परिस्थितीमुळे आरोग्य व आहार न मिळणे या संकटाशी लढणे गरजेचे आहे. त्यांनी यावेळी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी जिल्ह्यात हिरकणी कक्षासाठी सुरु केलेल्या मोहिम व प्रचाराबद्दल त्यांचे कौतुक केले. सहा महिन्यापर्यंत मातेचे दूध नवजात शिशुला आवश्यक असून आत्मसन्मानाने स्तनपान करता यावे यासाठी सर्व जागांवर व्यवस्था व्हावी. यासाठीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री संजय देवतळे, जिल्हा परिषद सभापती जिवतोडे, वरोऱ्याच्या सभापती रोहिणी देवतळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, संरपच मारोतराव झाडे आदी उपस्थित होते.

आरोग्य केंद्रांना सर्व सोयीयुक्त बनविणार
जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रातील सर्वाधिक सोयीयुक्त बनवायचे आहे. हा आपला संकल्प असून मानव विकास मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण, आरोग्य व रोजगार या मुद्यांवर जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मदरडेअरी सोबत चर्चा झाली असल्याचे यावेळी ना. मुनगंटीवार सांगितले.

Web Title: The malnutrition in Chandrapur district will be brought to zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.