मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी पुरूष अधीक्षकाकडे
By Admin | Updated: March 30, 2015 00:40 IST2015-03-30T00:40:04+5:302015-03-30T00:40:04+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वरोरा शहरात आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे.

मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी पुरूष अधीक्षकाकडे
वरोरा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वरोरा शहरात आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहाची जबाबदारी मागील एक वर्षापासून पुरूष अधीक्षक सांभाळत आहेत. या अधीक्षकाकडे परत एका वसतिगृहाचा प्रभार आहे. महिला अधीक्षक नसल्याने वसतिगृहातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर अंतर्गत वरोरा शहरात मागील काही वर्षापासून मुलीचे वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या ८० मुली वास्तव्यास आहेत. मागील वर्षी महिला अधीक्षक निवृत्त झाल्यानंतर आज एक वर्षाचा कालावधी लोटूनही या ठिकाणी महिला अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक असलेल्या व्यक्तीकडे मुलींच्या वसतिगृहाचा प्रभार देण्यात आला आहे. प्रभारी तेही पुरुष अधीक्षक असल्याने वसतिगृहातील मुलींना आपल्या समस्या सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुली व सोबतच विद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या मुलींचा वसतिगृहात समावेश असल्याने लहान मुलींचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने वसतिगृहामध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या. त्यानंतर अलिकडेच जाहिर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुलीच्या वसतिगृहाला सुरक्षा भिंत बांधण्याकरिता तरतूददेखील करण्यात आली आहे. अशा सर्व सुविधा शासन निर्माण करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे वरोऱ्यात मुलींच्या वसतिगृहात स्त्री अधिक्षकाचे पद मागील एक वर्षांपासून रिक्त ठेवून ही जबाबदारी पुरुष अधीक्षकाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात चिमूरचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता महिला अधीक्षक पदाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यातून निवड झाल्यानंतर तातडीने मुलीच्या वसतिगृहात महिला अधीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)