पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून करा
By Admin | Updated: March 17, 2016 01:00 IST2016-03-17T01:00:49+5:302016-03-17T01:00:49+5:30
पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल,...

पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून करा
संध्या गुरुनुले : जल सप्ताहाचा शुभारंभ, पाच नद्यांवर जलपूजन
चंद्रपूर : पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले.
जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने दाताळा पुलाजवळील इरई नदीच्या काठी आयोजित जल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अधीक्षक अभियंता जी. मो. शेख, नगरसेवक संजय वैद्य व अंजली घोटेकर उपस्थित होत्या. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट व वर्धा नदीतील पाण्याच्या कलशाचे पूजन करुन जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जल सप्ताहाचे उद्घाटन झाले.
कमी होत चाललेला पावसाळा व घटत चाललेली भूगर्भातील पाण्याची पातळी पाहता भविष्यात गंभीर जल संकट निर्माण होऊ शकते, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाल्या, घरगुती वापरापासून पाण्याची बचत केल्यास भविष्यात भासणाऱ्या पाणी संकटावर मात करण्याची सुरुवात ठरु शकते. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम सप्ताहात घेण्यात येणार आहेत, असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सातत्याने पाणी उपसा होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला असून त्याचे परिणाम मराठवाड्यातील पाणी टंचाईवरुन दिसून येते. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात मराठवाड्यासारखी स्थिती नसली तरी वेळीच उपाययोजना न केल्यास ही परिस्थिती केव्हाही येऊ शकते, ही बाब लक्षात घेता पाणी बचत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक अधिक्षक अभियंता जी.मो. शेख यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जल जागृती पोस्टरचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
शाळांमध्ये जनजागृती
नागरिकांनी छोट्या छोटया प्रयत्नातून पाणी बचत केल्यास पाणी वाचवा ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते असे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतर्फे शाळांमध्ये पाणी वाचवा या विषयी जागृती करण्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १७ शाळांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देणारे विविध कार्यक्रम, व्याख्यान, स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.